
दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२४ | सातारा |
सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथील वरिष्ठ लिपिक (वर्ग-३) श्रीकृष्ण दामोदर पाथरे (वय ५६) याला न्यास नोंदणी कामी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार या व्यवसायाने वकील असून त्यांच्याकडील अर्जदार याची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची दोन प्रकरणे ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सातारा विभाग सातारा यांच्या कार्यालयात दाखल प्रकरणाबाबत चौकशीची जाहीर नोटीस काढण्याकरता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दोन प्रकरणांसाठी १००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना लोकसेवक पाथरे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
याबाबत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई राजेश वाघमारे लाचलुचपत विभाग उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पो.ह.गणेश ताटे, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, प्रियांका जाधव, अजित देवकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, सहाय्यक धर्मादाय आयुक्तातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबाबत सहा महिन्यांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातार्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.परंतु त्यावेळी जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. त्यामुळे आम्ही केलेले आंदोलन योग्यच होते हे यावरुन स्पष्ट होत आहे. आता तरी या कार्यालयातील उच्चस्पद अधिकार्याची केवळ चौकशी न करता त्यांना प्रसंगी अटकही झाली पाहिजे अशी मागणी सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर माळवदे , सुशांत मोरे व इतरांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.