
दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील एका गावात अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ एका वीस वर्षाच्या युवकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचारामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक आँचल दलाल यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, याबाबत सातारा पोलीसात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी नंतर आणखी काही कलमे वाढवावी लागल्यास ती वाढवली जाणार आहेत. दरम्यान, सध्या जखमी अवस्थेतील मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला गुन्हा नोंद करण्यापूर्वी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सकाळी या घटनेची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.