दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2024 | सातारा | सातारा जिल्ह्याचे नेते व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आज संपन्न होत असलेल्या महायुतीच्या सभेसाठी अनुपस्थित दिसल्याने त्यांच्या मनात काही वेगळा विचार सुरू आहे का ? अशी चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला असता; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार मी पुणे येथील महायुतीच्या कार्यक्रमास उपस्थित आहे; असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथे सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची भव्य दिव्य सभा गांधी मैदानावर संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या सभेस अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
सातारा येथे संपन्न होत असलेल्या सभेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांची उपस्थिती आहे; परंतु जिल्ह्याच्या राजकारणावर वचक असणारे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती नसल्याने सर्वांचेच डोळे उंचावले आहेत.