झिरपवाडीत सुमारे साडेपंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । फलटण । फलटण सांगली रस्त्यावर झिरपवाडी ता. फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुक करणार्यास सापळा रचुन अटक करण्यात आली आहे. यावेळी ७१९ किलो गुटखा व पिकअप असा मिळून पंधरा लाख ४३ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश विलास सरगर रा. मिरज जि. सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची चोरटी वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाल्याने फलटण शहर पोलिसांनी मंगळवार दि. १९ जुलै रोजी फलटण सांगली मार्गावर झिरपवाडी गावच्या हद्दीत सापळा लावला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडी क्रमांक एम एच १० एक्यू ४२३८ या गाडीस थांबविण्यात आले व तीची तपासणी केली असता गाडीत विमल केसरी युक्त पानमसाला, व्ही 1, सुगंधी तंबाखू प्रिमियम R.M.D. पान मसाला असा एकुण ७१९.९ किलो वजनाचा दहा लाख ४३ हजार २०० रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी सदर किंमतीचा गुटखा व पाच लाख रुपये किंमतीची पिकअप असा एकुण पंधरा लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी योगेश विलास सरगर वय २४ रा. रोड नंबर ११, समतानगर, मिरज जि. सांगली यास पोलिसांनी अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा विकास सोनवणे यांनी फिर्याद दिली असुन तपास सपोनि नितिन शिंदे हे करीत आहेत. सदर कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नितिन शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कदम, पोलिस हवालदार निलेश काळोखे, विजय खाडे, चंद्रकांत काकडे, विठ्ठल विरकर, पोलिस नाईक अमृत कर्पे, पोलिस कॉन्स्टेबल अच्युत जगताप, राजेंद्र नरुटे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!