दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना एका कंपनीस गंडा घातल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी महेश कुमार (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा मे. ताडे पावरटेक कंपनी येथे आला. त्याने कंपनीतील प्रथमेश सुखदेव कारेकर यांची भेट घेऊन त्यांना मी व्ही. टेक इंटरप्राईजेस कंपनी मुंबई येथे काम करतो. आमची कंपनी इलेक्ट्रिकल पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांना टेस्टिंग सर्टिफिकेट मिळवून देते. तसेच तुमच्या कंपनीला टेस्टिंग सर्टिफिकेट लागणार आहेत काय, अशी विचारणा केली. त्याप्रमाणे कारेकर यांनी कंपनीचे मालक प्रकाश ताडे यांना फोन करून संबंधित बाब सांगितली. ताडे यांनी आपल्या कंपनीला पाच इलेक्ट्रिकल टेस्टिंगचे सर्टिफिकेट लागणार आहेत. ते देत असतील तर सर्टिफिकेट घ्या व लागणारे पैसे त्यांना द्या, असे सांगितले. त्यावर कारेकर यांनी महेश कुमार यांच्याबरोबर चर्चा करून किती खर्च होईल असे विचारले तेव्हा 96 हजार 520 इतका खर्च सांगण्यात आला. ॲडव्हान्स म्हणून पन्नास हजार रुपयाची मागणी महेश कुमार यांनी केली. यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतील, असे सांगितले कारेकर यांनी महेश कुमार याला पन्नास हजार रुपये रोख ॲडव्हान्स पोटी दिले. या बदल्यात महेश कुमार यांनी कारेकर यांना बिलाची पावती दिली व ते निघून गेले. यानंतर दि. 6 डिसेंबर 2021 रोजी महेश कुमार पुन्हा कंपनीत आले व त्यांनी पाच प्रकारचे इलेक्ट्रिकल टेस्टिंग सर्टिफिकेट कारेकर यांना दिले आणि राहिलेले 46 हजार 520 रुपये घेऊन बिलाची पावती सुद्धा दिली. कारेकर यांनी त्या दोन्ही पावत्या त्यांच्या कंपनीत जमा केल्या. यानंतर कंपनीतर्फे मॅनेजर म्हणून कारेकर यांनी ही पाच टेस्टिंग सर्टिफिकेट्स कंपनीमार्फत महावितरण प्रकाशगड, अंधेरी रोड, वांद्रे, मुंबई येथे अमोघ सिद्धी ताडे यांच्या मार्फत पाठवली. त्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजीच्या पत्राद्वारे महावितरण प्रकाशगड यांनी पत्र पाठवून महेश कुमार यांनी दिलेली ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे लेखी कळवले. कारेकर यांनी त्यानंतर महेश कुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता. तसेच कंपनीच्या ऑनलाईन तसेच मुंबईमधील सहकारी मित्रांकडे विचारपूस करून शोध घेतला असता त्या नावाची कंपनी सापडली नाही. फसवणूक झाल्याचे लक्ष येताच कारेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात महेश कुमार यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.