दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
संक्रांतीला मातीच्या सुगड्यांमधून वाण देण्या-घेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त महिला विविध वस्तूंचे वाण लुटतात. एकदा तरी कुंभाराचा ‘आवा’ लुटावा असे महिलांना वाटते.
‘संक्रांत’ हा सुवासणींचा सण एकमेकींना सौभाग्याचे वाण देताना संसारोपयोगी वस्तूंची भेट दिली जाते. यातच जुन्या काळापासून हळदी-कुंकूवाच्या राशी, कुंभाराचा आवा, कासाराचा आवा लुटण्याची पद्धत आहे. असाच आवा लुटण्यासाठी बुरूड गल्ली येथील श्री. नाना दुधाळ हे सपत्नीक महिलांसह फलटणच्या कुंभारवाड्यात सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वाजत-गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत कुंभारवाड्यात दाखल झाले.
हा आवा सडारांगोळी काढून सजवण्यात आला होता. या आव्यामध्ये रांजण, डेरे, बारीक गाडगी, पणत्या, गुडग्या, कुंड्या रचून हा आवा लावला जातो.
सर्वप्रथम या आव्याची श्री व सौ. दुधाळ यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. तसेच आवा लावणारे श्री. बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांचा पूर्ण पोशाख श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महिलांनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे देऊन ‘तीळगुळ घ्या… गोड गोड बोला’चा संदेश देऊन शुभेच्छा. नंतर आवा लुटण्यात आला. आवा लुटण्यासाठी व पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. आवा लुटल्यानंतर महिलांनी लुटलेल्या वस्तू डोक्यावर घेऊन वाजत-गाजत घरी घेऊन गेल्या.