आस….. : राजेंद्र शेलार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.१४: गावातील वलखाड नावाचे शिवार कालपासून गजबजले होते. बऱ्यापैकी पाऊस पडून गेल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी जोर धरला होता. महादूही दोन दिवसांपासून शेताची मशागत करत होता. पेरणीची घात जाऊ नये म्हणून सगळ्यांची लगबग सुरु होती पण महादू जरा शांत शांतच होता. दरवर्षी पेरणीत आघाडी घेणाऱ्या महादूला यावर्षी नेमके काय झाले असावे असा विचार आजूबाजूचे शेतकरी करीत होते. आज सकाळीच महादू पेरणी करण्याच्या तयारीने वलखाडात पोचला होता. दहा साडेदहा वाजेपर्यंत सगळी तयारी करायची आणि घरातले लोक आले की पेरायला सुरुवात करणे हा त्याचा नेहमीचा शिरस्ता होता. नेहमीप्रमाणे पाटीत जेवणाचा डबा आणि सोबत मदतीला दोन बायकांना घेऊन महादूची पत्नी शेतात पोहोचली. औताला जुंपलेले बैल शेताच्या मध्यभागी उभे होते पण महादू कोठेच दिसत नव्हता. तीने संपूर्ण शेतावर नजर फिरवली, तर अजून पाहिली पाळी देऊन झालेली नाही हे तीच्या लक्षात आले. तिच्या सोबत आलेल्या महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या काही पहिल्यांदा आल्या नव्हत्या! गेली कित्येक वर्षे त्या महादूच्या शेतात पेरणीसाठी मदतीला येत होत्या. केवढा उत्साह असायचा महादूचा! कितीही लवकर पोहचलं तरी महादू सगळी काम आटोपून पत्नीची वाट पहात बसलेला असे. ‘किती उशीर लावला यायला, कधी एकदा पेरुन होतय आस झालंय मला आणि तुमचं बर निवांत चाललंय?’ हा नेहमीचा डायलॉग ऐकण्याची सवय झालेल्या त्या महिलांना अजून कशाचाच पत्ता नाही हे पाहून आश्चर्य वाटले. कोपऱ्यातल्या मोठ्या झाडाखाली महादू पायात डोकं घालून बसलेला त्यांनी पाहिला. या तिघी तिथं पोहचल्या तरीही महादूच्या लक्षात आले नाही. त्याच्या पत्नीने हाक मारुन त्याला सावध केला. मान वर करुन अत्यंत खिन्न डोळ्यांनी महादूने त्यांच्याकडे पाहिले. महादूची ही अवस्था पाहून त्याची पत्नी व्याकुळ झाली. गेला सगळा आठवडा महादूची तगमग ती पहात होती. शांतपणे महादूकडे पहात तीने नजरेनेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजाने महादू पेरणीच्या कामाला लागला. नेहमीसारखा उत्साह नाही, गडबड-गोंधळ नाही, जोरजोरात ओरडणे नाही, अगदी जीवावर आल्या सारखं महादूच काम चाललं होत. दुपारी सगळे जेवायला बसले तेंव्हा न राहवून एका महिलेने महादूला छेडलेच.. दादा काय झालंय तुम्हाला? आज नेहमीसारखं रागावला नाय, हासत बैलांवर खेकसला नाय, कसला त्रास होतोय का तुम्हाला ? महादूनं आकाशाकडे पाहिलं नी घळाघळा त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. जड अंतःकरणाने महादू बोलू लागला… ‘ताई या वर्षीपण माझा पांडुरंग मला भेटणार नाही आस वाटतंय. दोन वर्षे झाली त्याच्या भेटीला आणि यंदाही भेटला नाही तर काय राम आहे आपल्या जगण्यात? पांडुरंगाचं ते सुंदर, गोजिरवाणं रुप सारखं डोळ्यासमोर येतंय. पेपरात आलं होत, बहुतेक यावर्षीही आषाढी वारीला परवानगी मिळणार नाय. तेंव्हा पासून जेवण गोड लागत नाय आणि कामात मन रमत नाय. सगळं चित्त त्या सावळ्या विठ्ठलाकड लागलंय. तस ते दरवर्षी लागायचं पण ते केंव्हाएकदा पंढरपूरला पोचतोय व त्याची भेट होतेय यासाठी असायचं. पेरण्या उरकण्याची घाई आणि त्यातला उत्साह हा पंढरपूरला जाण्यासाठी असायचा ताई. त्यामुळे त्याच्या भेटीची आस मनाला प्रसन्न करणारी असायची. मात्र यावर्षीची आस वेदनादायी आहे, मनाची ही आस पुरी होणार नाही म्हणून हे दुःख आहे;’

प्रसंग दुसरा –
नेमकं काय झाले असेल पीए साहेबांना.? मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एका दालनात चार पाच जणांची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. नेहमी हसतमुख आणि आनंदी असणारे साहेब कालपासून अगदी गप्प गप्प होते. आपल्या सहकाऱ्यांची कधी चेष्टामस्करी करुन, कधी त्यांना कोपरखळ्या मारुन तर कधी मोठ्या साहेबांची नक्कल करुन सगळ्यांना खुश करणारे, आनंदी ठेवणारे साहेबच असे धीरगंभीर झाल्यामुळे सगळ्या दालनात सन्नाटा पसरला होता. कोणालाच काही अंदाज येत नव्हता, नुसतीच कुजबुज चालू होती. शिपाई शेख आज थोडा उशिरा कामावर आला होता. हा शेखही तसा खेळकर स्वभावाचा. “काय सरकार कोसळलं की काय?” ऑफिसमधले वातावरण बघून तो जोरात ओरडला. त्यामुळे सगळे एकदम चपापले. ‘अरे हळू बोल पीए साहेबांचा मूड काही ठीक नाही, मख्ख चेहऱ्याने नुसते शून्यात बघत बसलेत. ओरडू नकोस नाहीतर सगळा राग तुज्यावर निघेल.’ एकाने शेखला माहिती दिली. आता सगळा प्रकार शेखच्या लक्षात आला. त्याने लगेच खुलासाही करुन टाकला ‘बहुतेक कालची बातमी तुम्ही कोणी वाचलेली दिसत नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी पालखी सोहळा आणि पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली आहे. आपले पीए साहेब माळकरी आहेत, दरवर्षी पालखी प्रस्थानाला आळंदीत आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा त्यांचा कित्येक वर्षांपासूनचा नेम आहे. यावर्षीही वारी घडणार नाही, पांडुरंगाचं दर्शन होणार नाही याच फार मोठ दुःख त्यांच्या मनाला झाले असेल. कितीही कठीण प्रसंगात मनाची प्रसन्नता न हरवणारे साहेब वारीच्या बाबतीत अत्यंत हळवे आहेत. सलग दोन वर्षांचा विरह त्यांच्या मनाला वेदना देणारा आहे. त्यामुळे साहेब असे उद्विग्न झाले असावेत.’ शेखने केलेला हा खुलासा अगदी बरोबर होता, पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या साहेबांना यावर्षीही वारी रद्द झाल्याचे समजल्यापासून अस्वस्थ वाटू लागले होते, त्यांचे मन कशातही रमत नव्हते आणि पांडुरंगाची ती सगुण मूर्ती सतत डोळ्यांपुढे उभी राहात होती.

अवघ्या महाराष्ट्राची अवस्था अगदी अशीच झाली आहे. प्रत्येकाला पायीवारी पालखी सोहळा आणि श्री.पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली आहे. शेतकरी असलेला महादू आणि मंत्रालयातील पीए साहेब ही त्याची प्रतीके आहेत. पंढरपूरची वारी आणि पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकप्रवाह आहे. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाची अत्यंत महत्वाची यात्रा. विठ्ठल, ज्ञानोबा, तुकोबा या शब्दांतील तीन अक्षरांची जादू नेमकी काय आहे याचा शोध प्रत्येकवर्षी या वारीत घेतला जातो. या आनंदवारीने समतेचा, विश्वबंधुत्वाचा आणि डोळस भक्तीचा विचार संपूर्ण जगाला दिला आहे. युगानुयुगे कटेवर कर ठेऊन उभी असलेली श्री.विठ्ठलाची सावळी, लोभस मूर्ती सर्वांना प्रेमसुख देते अशी वारकऱ्यांची मनोमन धारणा आहे. त्या प्रेमसुखाची आस प्रत्येकाच्या मनाला लागली आहे. ही आस आजची नाही बर का! तिलाही अनेक युगांचा वारसा आहे.

श्री.विठ्ठलाची तेज:पुंज, दिव्य मूर्ती डोळ्यांनी पाहणं हा वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा असतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा | रविशशिकळा लोपलिया || असे म्हणताना तुकाराम महाराज देहभान हरपून जातात. सुंदरपणात जो मदनापेक्षा देखणा आहे, चतुरपणात जो ब्रह्मदेवाचाही बाप आहे, त्रैलोक्यात जो सर्वांपेक्षा उदार आहे, सर्व तीर्थांपेक्षा जो पवित्र आहे आणि यच्चयावत जीवांचा जो आधार आहे असा श्री. विठ्ठल आमचा देव आहे. तो आमच्या हृदयात नित्य वास करीत असून आम्ही सदैव त्याचेच नामस्मरण करीत असतो. त्याच्या दर्शनाने आम्हाला परम सुख प्राप्त होते. जसे चकोराला चंद्रांच्या आणि मयूराला मेघांच्या दर्शनाने आनंदाचे भरते येते तसे श्री. विठ्ठलाच्या दर्शनाने आमचे मन आनंदाने भरुन वाहते. रत्नमुगुट-कुंडलांनी त्याचे मुख शोभायमान झाले आहे, त्याच्या दिव्य कांतीतून प्रसवणारी तेजस्वी प्रभा आसमंत उजळून टाकत आहे, त्याच्या या अगणित लावण्याचे वर्णन करायला आमचे शब्द भांडार कमी पडत आहे अशी कबुली श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे. सुखाचे हे सुख श्रीहरी मुख | पाहताची भूख तहान गेली || असे म्हणत नामदेव महाराजांनी श्री. विठ्ठलाच्या पायी लोटांगण घातले आहे. अवघ्या महाराष्ट्राला या श्री. विठ्ठलाचे अप्रूप का आहे हे यावरुन आपल्या लक्षात येईल. महादू पेरणी विसरला आणि पीए साहेब विन्मुख होऊन भान हरपले त्यात नवल ते काय? ते तर वारकरी आहेत; पण नित्याचे वारकरी नसलेल्या महाराष्ट्रातल्या घराघरात सगळ्यांचेच मन कासावीस झाले आहे. प्रत्येकाच्या मनाला एकच आस लागली आहे; श्री. विठ्ठल दर्शनाची आणि संत समागमाची…

या पंढरीचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात..
जंववरी नाही देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोरी वैकुंठीची ।। मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारी । होऊनी कामारी दीनरुप ।। वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरीं ।। नामघोष कथापुराण कीर्तनी । ओविया कांडणी पांडुरंग ।। सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म ते केवळ नांदतसे ।। तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हे प्रत्यक्ष दिसे विटेवरी ।।

भेटीलागी जीवा.. लागलेसी आस.!!!

: राजेंद्र आनंदराव शेलार
भिवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा


Back to top button
Don`t copy text!