दैनिक स्थैर्य । दि. ३ जुलै २०२१ । सातारा । सातार्यातील बाँबे रेस्टॉरंट चौकाजवळ टेम्पोची तीन वाहनासह पादचारी युवकाला धडक बसली. यामध्ये एक युवक जागीच ठार तर कारमधील चौघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो पलटी झाल्याने सेवा रस्त्यावर कोबी भरलेली पोती आणि गड्डे विखुरले होते.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कर्हाड बाजुकडून टेम्पो (केए.02, एएफ 2215) सातार्याकडे येत होता. या टेम्पोमध्ये कोबी भरलेली होती. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळील ठक्कर सिटी समोर टेम्पो महामार्गावरुन बाजुचा कठडा ओलांडून सेवा रस्त्यावर आला. या टेम्पोची धडक कार, दुचाकी, पिकअप तसेच पादचारी युवकाला बसली. त्यानंतर टेम्पो पलटी झाला. या अपघातात किरण गोरख गुजर (वय 35, रा. भोसरे, ता. खटाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर कारमधील चौघेजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, टेम्पो पलटी झाल्यानंतर कोबीची पोती सेवारस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. तर कोबीचे गड्डेही विखुरले गेले होते. या अपघातात टेम्पोसह, कार, दुचाकी आणि पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सातारकर नागरिकांनीही पाहण्यासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, अपघातात ठार झालेला युवक हा भोसरे येथील रहिवाशी होता. तो रंगकाम व्यावसायिक होता. सध्या त्याचे वास्तव्य सातार्यातील गोडोली परिसरात होते. तो खरेदीसाठी एका ठिकाणी जात होता. पायी जात असतानाच हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.