स्थैर्य, लोणंद, दि.१२: पाडेगाव येथून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्यात वाहत चालेलेल्या महाविद्यालयीन युवकास पाडेगाव येथील तरूण रणजित काळे यांनी जीवाची बाजी लावून वाचवले . सुमारे पंधरा मिनिटे चाललेला हा थरार दोघांच्याही जीवावर बेतणार की काय अशी शक्यता काही काळ निर्माण झाली होती. मात्र चिकाटी न सोडता रणजितने अखेर त्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.
पाडेगाव आजोळ असलेला महाविद्यालयीन युवक अंकुर लोखंडे हा शेजारच्या मुला सोबत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पुर्ण क्षमतेने वाहत असलेल्या निरा उजव्या कालव्यात पोहायला गेलेला होता. यावेळी नीट पोहता येत नसल्याने तो पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. त्याचवेळी आपल्या कामानिमित्त शंभर मीटरवरून चाललेल्या रणजित काळे या तरूणाला एका व्यक्तीने कोणाचातरी पोरगा वाहत चाललाय हे सांगितलं. क्षणाचाही विचार न करता रणजितने कॅनाॅलच्या दिशेने धाव घेऊन पलिकडच्या तीरावर चाललेला थरार पाहून पाण्यात सूर मारुन पोहत दूसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. आपल्याला वाचवायला आलेल्या रणजितला अंकुरने घाबरून मिठी मारल्याने मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. काठावर असलेल्या काही लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती . अशा कठीण परिस्थितीतही रणजितने चिकाटी न सोडता अंकुरला पाय टेकतील एवढ्या पाण्यात खेचून आणल्यावर गावातील दूसरा तरूण संतोष मोहिते याने हात देऊन दोघांनाही पाण्याबाहेर काढले.
रणजित काळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे. लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी व पाडेगाव ग्रामपंचायत यांनी रणजितच्या धाडसाचे कौतुक करून त्याचा सन्मान करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.