दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा शहरातील चंदुकाका सराफ यांच्या दुकानात दागिन्यांची चौकशी करण्याच्या निमित्ताने आलेल्या एका महिलेने एक लाख 67 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हातच्यालाखीने लांबवली होती. या महिलेला सातारा शहर पोलिसांनी कोरेगाव येथून अटक केली. माधुरी काशीराम राठोड वय 52, सिंदर्गी तालुका विजापूर असे संबंधित महिलेचे नाव आहे.
यासंदर्भातील पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी सातारा शहरातील चंदू सराफ ज्वेलर्स यांच्या दुकानात सदर महिला सोने खरेदीच्या निमित्ताने आली होती. तिने हातचलाखीने एक सोन्याची माळ आपल्या अंगावरील स्कार्फमध्ये लपवली. त्यानंतर ती तेथून निघून गेली. दुकान बंद करताना ज्वेलर्समधील कामगारांना एक दागिना कमी असल्याचे दिसून आले. दुकानातील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता अनोळखी महिलेने दागिना चोरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना तात्काळ तपासाच्या सूचना केल्या. शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात सदर महिलेची ओळख पटवून या महिलेला ताब्यात घेतले. ही महिला मूळची विजापूरची असून ती काही वर्षांपूर्वी कोरेगाव येथे राहण्यात आली होती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या गोपनीय बातमीदार मार्फत तिचा ठावठिकाणा माहिती करून तिला महिला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तिने आधी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर महिलेला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने ही चोरी केल्याचे कबूल केले. एक लाख 67 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरीक्षक सुधीर मोरे, गणेश ताटे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण ज्योतीराम पवार पंकज डहाणे अभय साबळे गणेश भोंग सागर गायकवाड गणेश घाडगे संतोष कचरे विशाल धुमाळ गणेश घाडगे मोनाली बोराटे यांनी कारवाईता भाग घेतला होता.