दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊन देखील यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीत मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या (proptiger.com) अहवालातून निदर्शनास आले आहे. भारतातील अव्वल आठ प्राथमिक निवासी बाजारपेठांनी या कालावधीदरम्यान चांगली कामगिरी केली असून विक्री व नवीन पुरवठ्यामध्ये अनुक्रमे २२ टक्के आणि ८६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रॉपटायगरडॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जानेवारी-मार्च २०२३’ अहवालानुसार वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रिअल इस्टेट विकासकांनी बाजारपेठेत नवीन उत्पादने आणली. आठ शहरांमधील विक्रीत गेल्या वर्षीच्या जानेवारी-मार्च कालावधीदरम्यानच्या ७०,६३० युनिट्सवरून जानेवारी-मार्च २०२३ मध्ये ८५,८५० युनिट्सपर्यंत वाढ झाली. या आठ प्रमुख शहरांमधील नवीन सादरीकरणांमध्ये ७९,५३० युनिट्सवरून ८६ टक्क्यांच्या वाढीसह १४७,७८० युनिट्सपर्यंत वाढ झाली, जी तिमाहीत सर्वाधिक आहे.
प्रॉपटायगरडॉटकॉम, हाऊसिंगडॉटकॉम आणि मकानडॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी श्री. विकास वाधवान म्हणाले, ‘‘भारतीय गृहनिर्माण बाजारपेठेत लक्षणीय वाढ होण्यासोबत विक्री आणि नवीन सादरीकरणे या दोन्हीमध्ये वाढ होत आहे. ही बाब विशेषतः आव्हानात्मक जागतिक वातावरण आणि देशांतर्गत बाजारपेठेत गृहकर्जावरील व्याजदरातील वाढ पाहता लक्षणीय आहे. या अडथळ्यांना न जुमानता अहवालात २०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील घरांच्या विक्रीत २२ टक्क्यांची उच्च दुहेरी-अंकी वाढ दिसण्यात आली आहे, ज्यामधून विक्रीला सतत गती मिळत असल्याचे दिसून येत आहे.’’
घरांच्या विक्रीत हैदराबाद शीर्षस्थानी असून येथे घरांच्या विक्रीत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या पाठोपाठ मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईचा क्रमांक लागतो जेथे अनुक्रमे ३९ टक्के, ३१ टक्के, १६ टक्के आणि १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली येथील घरांच्या विक्रीत अनुक्रमे ३ टक्के, २२ टक्के आणि २४ टक्क्यांची घट झाली आहे.
महाराष्ट्रातील दोन प्रमुख बाजारपेठा मुंबई व पुणे येथे विक्रीत अनुक्रमे ३९ टक्के आणि १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये निवासी मालमत्तांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील २३,३७० युनिट्सच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ३२,३८० युनिट्सपर्यंत वाढ झाली. पुण्यामध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील १६,३२० युनिट्सवरून कॅलेंडर वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १८,९२० युनिट्सपर्यंत वाढ झाली.
नवीन पुरवठ्यामध्ये मुंबई अग्रस्थानी:
विक्रीच्या तुलनेत आठही शहरांमधील नवीन सादरीकरणांमध्ये वाढ झाली, जेथे २०२३ च्या पहिल्या तिमाहीत एकूण १,४७,७९४ युनिट्स सादर करण्यात आले, जे तिमाहीमधील आतापर्यंतचे सर्वाधिक नवीन सादरीकरणे आहेत. यामुळे वार्षिक जवळपास ८६ टक्क्यांची वाढ झाली. नवीन पुरवठ्यासंदर्भात मुंबई शहर अग्रस्थानी म्हणून कायम राहिले, जेथे २०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील एकूण नवीन सादरीरकणांमध्ये मुंबईचा ४१ टक्क्यांचा मोठा वाटा होता.
२०२३ च्या पहिल्या तिमाहीत अधिकतम नवीन पुरवठा ४५ लाख ते ७५ लाख रूपयांच्या श्रेणीमधील होते, जेथे एकूण सादरीकरणांमध्ये सर्वोच्च (३२ टक्के) वाटा होता. १ कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या श्रेणीमधील युनिट्सचा देखील २९ टक्क्यांचा लक्षणीय वाटा होता.