• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सौजन्यमूर्ती श्रीमंत रामराजे…

Team Sthairya by Team Sthairya
एप्रिल 8, 2023
in अग्रलेख, इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, विशेष लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

महाराष्ट्र विधानपरिषद या “ज्येष्ठांचं सभागृह” असा लौकिक असलेल्या सभागृहाचे सभापतीपद भुषविलेले ज्येष्ठ नेते आणि फलटण येथील राजघराण्याचे श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर ८ एप्रिल, २०२३ रोजी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. राजेपद वारसाने लाभले असले तरी कर्तृत्वाने लोकसेवेचा वसा अखंडितपणे जपल्याने ते आज अखिल महाराष्ट्राचे सौजन्यमूर्ती आणि राजकारणातील सर्वपक्षीयांचे आदरस्थान ठरले आहेत. सभापतीपदी असतांना त्यांच्या दालनात सन्माननीय सदस्यच नव्हे तर सर्वसामान्यही आपले गाऱ्हाणे हक्काने मांडू शकत आणि न्याय पदरात पाडून घेत. कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळ, खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढयाची यशस्वी सांगता, महसुली कागदपत्रांची संगणकीय नोंदणी ते “पेपरलेस डेमोक्रसी”साठी विधिमंडळात हाती घेतलेले विविध उपक्रम, वातावरणीय बदलांचा धोका ओळखुन करावयाच्या तातडीच्या उपाययोजना असा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा आयाम फार मोठा आहे.

“परफेक्ट टायमिंग”चे चौकार आणि षटकार…

पुण्यात एलएल.एम. पर्यंत उच्चशिक्षण घेतल्यानंतर ते फलटणला आले आणि फलटणच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. शिक्षण आणि अध्यापन क्षेत्राची त्यांना विशेष आवड असल्याने प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी विधी महाविद्यालय, फलटण या संस्थेची स्थापना करीत तेथे पाच वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली. फलटण एज्युकेशन सोसायटी, आयएलएस विधी महाविद्यालय तसेच सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय येथेही प्राध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिले. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेपासून उत्तम क्रिकेटपटू असलेले रामराजे साहेब राजकारणातील “परफेक्ट टायमिंग”च्या चौकार आणि षटकारांसाठी देखील प्रसिध्द आहेत!

फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच कै. निर्मलादेवी ट्रस्टची स्थापना करून त्यामाध्यमातून महिलांना उद्योग मिळवून देण्याचे त्यांचे कार्य महत्वाचे ठरले आहे. सन १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९ असे तीन टर्म ते विधानसभेवर तर सन २०१० ते २०१६, २०१६ ते २०२२ आणि २०२२ ते २०२८ असे तीन टर्म ते विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. सन १९९५ ते १९९९ या काळात कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले भगीरथ कार्य अतिशय महत्वाचे ठरले आहे. कृष्णा पाणी तंटा लवादापुढे महाराष्ट्र शासनाची बाजू प्रभावीपणे मांडून राज्यास वाढीव ८१ टी.एम.सी. पाणी मिळविण्यात त्यांना यश आले. या विभागातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, सिंचनक्षेत्राचा विस्तार व्हावा यादृष्टीने ते अविश्रांत कार्यरत आहेत. उमरोडी, धोमबलकवडी प्रकल्प यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. महसूल आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री तसेच पुढे जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. महसूल राज्यमंत्री असतांना नोंदणीकृत कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यासंदर्भात त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.

खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनांच्या संदर्भात खंडकरी शेतकऱ्यांचा लढा ऐतिहासिक ठरला आहे. प्रथम मुख्यमंत्रीपदी स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब असतांना सुरू झालेला हा लढा मुख्यमंत्रीपदी श्री. पृथ्वीराज चव्हाण असेपर्यंत म्हणजे ५० वर्षांपेक्षा अधिक काळ खंडकरी शेतकऱ्यांचे नेते आणि स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. यासंदर्भात माननीय श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. (२० ऑगस्ट, २०००) होती. खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करून देण्याच्या संदर्भात त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन शिफारस केली. खंडकरी शेतकरी आणि कामगार यांना न्याय देणारा अतिशय समतोल अहवाल त्यांनी तयार केला. अनेक खंडकरी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते श्रीरामपूर, वालचंदनगर आणि फलटण येथे समारंभपूर्वक खंडकरी शेतकऱ्यांना ७/१२ चे वाटप करण्यात आले आणि या ऐतिहासिक लढ्याची यशस्वी सांगता झाली.

विधानमंडळात विविध उपक्रम

ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी त्यांची दोन वेळा सर्वसहमतीने बिनविरोध निवड झाली. मार्च २०१५ ते जुलै, २०२२ या त्यांच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात विधानमंडळात अनेकविध महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या तंत्रस्नेही आणि अभ्यासूवृत्तीमुळे अधिवेशनकाळात ऑनलाईन प्रश्नस्वीकृती, संगणकीकरण, सन्माननीय सदस्यांना सभागृहातील आसनस्थळी लॅपटॉप सुविधा, सन्माननीय सदस्यांसाठी परदेश अभ्यासदौरे, पर्यावरणजागृती आणि जागतिक तापमानवाढ संदर्भात सादरीकरण आणि कार्यशाळा, या उपक्रमास ग्रेट ब्रिटनच्या मुंबईतील उच्चायुक्तांची लाभलेली उपस्थिती, विधिमंडळाच्या जागतिक तापमानवाढ संदर्भातील तदर्थ समितीची स्थापना आणि समितीच्या महत्वपूर्ण शिफारसी तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे राबविण्यात आलेले विविध उपक्रम, माजी सभापती, माजी राज्यपाल दिवंगत श्री. रा.सू.गवई यांचा “अजातशत्रू” स्मृतिग्रंथ, दिवंगत कृषीमंत्री श्री. भाऊसाहेब फुंडकर यांचा “भूमिपुत्र” हा स्मृतिग्रंथ, नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी लोकसभा सचिवालयात अभ्यासवर्ग अशी उपक्रमांची मालिका खूप मोठी आहे.

वातावरणीय बदलासंदर्भात जागृतीचे कार्य

सिंचन या विषयाबरोबरच त्यांचा जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदल या संदर्भात विशेष अभ्यास आहे. अवकाळी पाऊस तसेच पूरपरिस्थिती, भूस्खलन या समस्येची तीव्रता आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. लोकप्रतिनिधींची यासंदर्भातील जबाबदारी सर्वाधिक आहे आणि त्यानुसार धोरण राबविली जावी अशी आग्रही भूमिका घेत त्यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असलेल्या तदर्थ समितीच्या माध्यमातून सप्टेंबर, २०२१ मध्ये महत्वपूर्ण शिफारसी केल्या. वायुप्रदुषणामुळे तापमानवाढ होते, त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जावे. पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी स्थानिक विकास निधीतून ठराविक प्रमाणात खर्च करण्यास अनुमती देण्यात यावी, पर्यावरण रक्षणासाठी नगरविकास-वने-महसूल-पर्यावरण-परिवहन-उद्योग व ऊर्जा अशा सर्व विभागांनी एकत्रित काम करावे. सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे यापुढील निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरतांना त्या उमेदवाराने आपल्या मतदारसंघात किमान १० वृक्षांची लागवड करणे आवश्यक राहिल अशी अट टाकण्यात यावी.

विद्यमान आणि माजी सन्माननीय विधिमंडळ सदस्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला जाणे, त्यावर चर्चा होणे आणि तो मंजूर होणे ही संसदीय लोकशाहीतील अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सन्माननीय सदस्यांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि त्यासाठी निधीची तरतूद ही देखील महत्वाची बाब आहे. यादृष्टीने श्री. रामराजे नाईक-निंबाळकर साहेब सभापती असतांना उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी विधानपरिषद सदस्य श्री. हेमंत टकले, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे, उप मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री. अजितदादा पवार, तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा ऑक्टोबर, २०२१ मध्ये घेण्यात आली. अशा विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांसाठी सभापती महोदयांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन सर्वांना वेळोवेळी लाभत गेले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे चार महनीय नेते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत स्व. शंकररावजी चव्हाण, माजी मंत्री स्व. राजाराम बापू पाटील, माजी मंत्री स्व.डॉ. रफिक झकेरिया आणि माजी मंत्री स्व. यशवंतराव मोहिते यांचा एकत्रित जन्मशताब्दी सोहळा सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन येथे मार्च, २०२० मध्ये श्री. रामराजे नाईक-निंबाळकर साहेबांच्या पुढाकाराने साजरा झाला.

तीन मुख्यमंत्री आणि चार अध्यक्षांसमवेत काम

त्यांच्या सभापतीपदाच्या कार्यकाळाचा महत्वाचा आणखी एक संदर्भ म्हणजे श्री. देवेंद्रजी फडणवीस, श्री. उध्दवजी ठाकरे आणि श्री. एकनाथजी शिंदे असे तीन मुख्यमंत्री आणि श्री. हरिभाऊ बागडे, श्री. नाना पटोले, श्री. नरहरी झिरवाळ आणि ॲड. राहुल नार्वेकर असे चार विधानसभा अध्यक्ष यांच्या बरोबर काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. उच्चपदावर असतांनाही सर्व मतांचा आदर – diversed views must be acknowledged हा श्री. रामराजे नाईक-निंबाळकर साहेबांचा स्वभावधर्म आहे. अधिकारीवर्गावर विश्वासाने जबाबदारी सोपवून योजना वा कार्य तडीस नेणे ही त्यांची कार्यपध्दती उल्लेखनीय ठरली आहे. “शेकाप”चे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे ५५ वर्षे सन्माननीय सदस्य असलेले श्री. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहतांना “मार्क्स म्हणाला गणपतरावांना” ही माझी कविता सभापती महोदयांनी दोन दिवस आपल्या व्हॉटसॲप स्टेटसवर ठेवली होती…

२० मार्च, २०१५ रोजी त्यांची विधानपरिषद सभापतीपदी सर्व सहमतीने निवड झाली त्यावेळी मुख्यमंत्रीपदी असलेल्या श्री. देवेंद्र फडणवीस यांनी “महाराष्ट्राने आपणाकडे नेहेमीच सौजन्यमूर्ती म्हणून पाहिले आहे. सभापतीपदावर असतांना फार संयम ठेवावा लागतो. सर्वांना एकत्रित घेऊन सभागृहाचे कामकाज करावे लागते. सभापती पक्षाचे कधीच नसतात तर ते सभागृहाचे असतात. ती हातोटी आपल्यामध्ये आहे.” अशा शब्दात त्यांच्यासर्वसमावेशी व्यक्तिमत्वाचा गौरव केला होता. आज अशा अनेक सुखद आठवणींचा ठेवा आणि उत्तुंग कार्यकर्तृत्वाची मालिका सोबत घेत ते आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन.

– निलेश मदाने,
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तथा संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई.
[email protected]


Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारकडून मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप – जयंत पाटील

Next Post

मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ

Next Post

मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ

ताज्या बातम्या

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023

श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे

जून 8, 2023

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023
अग्निशामक केंद्रा समोर वृषरोपण करताना अधिकारी व पदाधिकारी

पर्यावरण दिनी बारामती एमआयडीसी मध्ये वृषरोपण

जून 8, 2023
वृक्षारोपण करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर

वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

जून 8, 2023
कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर

कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

जून 8, 2023

प्रवचने – भगवंताचे अनुसंधान राखावे

जून 8, 2023

महावितरण चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

जून 8, 2023

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

जून 8, 2023

सातारच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी; रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

जून 7, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!