फलटण शहर प्रभाग रचनेबाबत एकूण ८ हरकती सूचना दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । फलटण । फलटण शहर प्रभाग रचनेबाबत ८ हरकती सूचना दाखल झाल्या असून त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्या आहेत, तेथे सुनावणी होऊन आवश्यक शिफारशींसह त्या शासनाकडे पाठविल्या जाणार असल्याचे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.

फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करुन त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या असताना त्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती, त्यानंतर सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची अनुमती आल्याने दि. १० ते १४ मे दरम्यान त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या असता नव्याने ६ आणि स्थगिती येण्यापूर्वीच्या २ अशा एकूण ८ हरकती सूचना दाखल झाल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.

नगर परिषद विरोधी पक्ष मावळते गट नेते अशोकराव जाधव, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक व तत्कालीन शिक्षण मंडळ उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड, अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके आणि अमिरभाई शेख यांनी दाखल केलेल्या हरकती सूचना मध्ये प्रभाग रचना सलग असेल तर नगरसेवकांना विकासाची कामे करता येतील त्यासाठी सध्याच्या काही प्रभागातील सलगतेबाबत सूचना केल्या आहेत तर तुकाराम गायकवाड यांनी संपूर्ण प्रभाग रचना चुकीची असल्याने रद्द करुन फेर रचना करण्याची मागणी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!