दैनिक स्थैर्य | दि. 03 जानेवारी 2023 | फलटण | “पांढूरके शिंगळा घुबड” Pallied Scops Owl हे आपल्या भागात थंडीच्या दिवसांमध्ये चार हजार (4000) किलो मीटर स्थलांतर करून येते. अरेबिया व जॉर्डन येथून भारतात तसेच पश्चिम महाराष्ट्र यांचे मायग्रेशन आढळून येते. पांढूरके शिंगळा घुबड हे पक्षी स्थलांतर करून आले असल्याकारणाने हे एकत्र काही ठिकाणी दिसून येतात तसेच खुरट्या झाडांवर जमिनी पासून दोन ते पाच फूट अंतरावर बसलेले दिसून येतात.
मुख्य आहार छोटे कीटक, सरडे, पाली व उंदीर असा आहे .जॉर्डनमध्ये यांची 400 घरटी आढळून आलेली आहेत. यांची घरटे साधारणपणे सुतारपक्षासारखी झाडाला होल पाडून असतात. त्यामध्ये हे तीन अंडी देऊन 21 दिवसापर्यंत उबवण करून, पुढे तीस दिवस पिल्लांना सांभाळतात.
अरेबिया भागांमध्ये या दिवसांमध्ये प्रचंड थंडी पडते त्यामुळे कदाचित हे पक्षी उष्ण कटिबंधीय भागात स्थलांतर करत असावे. असा हा दुर्मिळ पक्षी सातारा भागात मला पहिल्यांदाच आढळून आला आहे; अशी माहिती नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे वन्यजीव अभ्यासक गणेश धुमाळ यांनी दिली.