दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । मुंबई । राज्यात सध्या मराठी, हिंदी, सिंधी या अकादमी अस्तित्वात आहेत. त्यांचे कार्य उत्तमरीत्या सुरू असून, आता तेलगु आणि बंगाली अकादमी स्थापन केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. सांस्कृतिक अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. राज्यात लहान लहान संग्रहालये असून, या संग्रहालयांमध्ये असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा व्यवस्थित जतन करण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. त्यासाठीच महासंग्रहालय उभे करून त्या ठिकाणी हा सर्व ठेवा जतन केला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
गडकिल्ल्यंसाठी महावारसा समिती
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने महावारसा समिती स्थापन केली आहे. ही समिती योजना आखणार असून, अंमलबजावणीसाठी सीएसआर निधीची मदत घेतली जाणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ३ टक्के निधी राखून ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.