दैनिक स्थैर्य | दि. 28 नोव्हेंबर 2023 | फलटण | दलित, पददलित, श्रमिक, कामगार व शेतकरी यांच्यावरील अन्याया विरोधात ब्रिटीश काळा मध्ये महात्मा फुले यांनी जो आसूड उगारला होता तसाच आसूड आता सर्व सामान्य जनतेने सध्याच्या परिस्थितीत शेतकरी,महिला दलित यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात उगारला पाहिजे. धर्म व जातीपाती मध्ये अडकलेल्या समाजाला आज राष्ट्र धर्माची आवश्यकता आहे आणि त्यासाठी महात्मा फुले यांचेच विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फलटण तालुक्यातील जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केली.
क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या १३३ व्या पुण्यतिथी निमित्त म.फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना सुभाषराव शिंदे बोलत होते.
सध्याच्या सर्व क्षेत्रातील अधोगती बाबत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या मार्गदर्शक विचाराचे बोट धरूनच सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते व सामान्य जनता यांनी सोडता कामा नये असेही सुभाषराव शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.