खाजगी व ग्रामीण रुग्णालयाने नकार दिल्याने उपचाराअभावी मृत्यू
स्थैर्य, वडूज, दि. 6 : वाकेश्वर, ता. खटाव येथील शाळकरी मुलास सर्पदंश झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमित अनिल फडतरे (वय 12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो ठाणेस्थित रंगकामगार व शिवसेना कार्यकर्ते अनिल बबन फडतरे यांचा मुलगा आहे.
लॉकडाऊनमुळे फडतरे कुटुंबीय गेली सहा महिने गावी वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी तो स्वतंत्र खोलीत अभ्यास करून झोपी गेला होता. साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. त्यानंतर तो अचानक ओरडत उठला. त्यांच्या तोंडाला फेस आला होता. काही वेळाने त्याचा आरडा-ओरडा ऐकून घरातील लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. काही वेळ प्राथमिक उपचार करून त्यास वडूज येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, कोविडच्या भयानक परिस्थितीत तीन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. तद्नंतर त्या कुटुंबाने बाधित मुलास घेऊन ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणी आता तेथे कोविडशिवाय कोणतेही उपचार केले जात नसल्याचा पवित्रा घेत संबंधितांना खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत त्या मुलाची प्राणज्योत मालवली होती.
सुमित हा दिवागाव (ठाणे) येथील शाळेत इ. 6 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण, आजी-आजोबा असा परिवार आहे. तो येरळा दूध डेअरीचे माजी चेअरमन बबनराव भैरू फडतरे यांचा नातू आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूबद्दल परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक ग्रामस्थांनी त्याचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोकाकुल वातावरणात वाकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.