दैनिक स्थैर्य | दि. २२ जुलै २०२४ | फलटण | फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका समाजकंटकाने केला. मात्र पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न भीमसैनिकांनी हाणून पाडला. फलटण शहर पोलीस स्टेशनला संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना, पक्ष यांच्यावतीने पुतळा विटांबनेच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ उद्या २३ जुलै रोजी सकाळी मंगळवार पेठ, फलटण येथून निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास,एक इसम दारू पिलेल्या अवस्थेत, हातात पिशवी घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर थांबून बडबड करत होता. त्यांनतर त्याने हातातील पिशवीतून शेण काढले, व मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच चौकात असणाऱ्या भीमसैनिकांनी व दक्ष नागरिकांनी त्या व्यक्तीस अटकाव करून विटंबनेचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनला संबंधित समाजकंटकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.