
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु । गुरुदेवो महेश्वर: ॥
गुरुर्साक्षात परब्रम्ह। तस्मै श्री गुरुवे नम: ॥
आपल्या भारतीय संस्कृतीला जगात सर्वश्रेष्ठ स्थान आहे. अतिशय सुरेख अशी परंपरा आपल्या भारतभूमीला लाभली आहे. त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे गुरु -शिष्य परंपरा आणि वात्सल्याचे प्रतिक असलेलं आई -मुलाचं नातं ही दोन नाती म्हणजेच या संस्कृतीच्या संस्काराचे मूळ होय. याच धारणेवर आज आपला देश जगात सर्वोच्च पातळीवर आहे. आपण देखील याचाच एक भाग आहोत. आजचा हा दिवस म्हणजे गुरु -शिष्य नाते संबंधाच्या पावित्र्याचा सोहळा होय. गुरु-शिष्यांच्या या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचा, हा वसा जपण्याचा एक प्रयत्न आपण सर्वजण करीत आहोत. आणि तो कालानुरूप टिकवण्याचा ध्यास ही घेतोय.
22 जून 2025 रोजी एक अघटीत घटना घडली आणि आमचे सद्गुरू परमपूज्य श्री. प्रभाकर दीक्षित सर गेल्याची बातमी समजली. मन कोलमडून गेले. क्षणभर काहीच सुचलेच नाही!
गेली 25 वर्षे मी ज्यांच्या संपर्कात होते. सातत्याने स्वत:च्या संसारातील अडचणींसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जात होते. हळूहळू आमच नात एवढ घट्ट झाले की, एकमेकांबद्दलचा विश्वास दृढ होत गेला व वडील – मुलगी या नात्यातून गुरु – शिष्याच्या नात्यात बांधले गेलो. बर्याचदा माझ्या प्रापंचिक अडचणींसाठी मी जात होते तेव्हा त्यांच्याशी मनसोक्त बोलायचे. बोलता बोलता त्यांच्याजवळ खूप रडायचे. त्यावेळी मला आधार देत म्हणायचे, हे तुझ माहेर आहे. तू कधीही हक्काने कोणत्याही वेळी येत जा. तेव्हा त्यांचा खूप आधार वाटायचा. अगदी वडिलांसारखे ते माझी काळजी घेत. एवढा अनुभव आला की, ज्या गोष्टी आई – वडील माफ करणार नाहीत अशा चुका फक्त सद्गुरू पोटात घालून घेतात आणि योग्य दिशा दाखवतात. याची प्रचिती आली. मनातील सल उलगडायची असेल, सर्व दु:ख, वेदना व्यक्त करायच्या असतील तर एकमेव व्यक्ती म्हणजे प्रा.दीक्षित सर. माझ्या जीवनातील त्याचं स्थान खूप मोठं आहे. मी आजवर माझ्या आयुष्यातील दु:खांना सामोरे गेली असेल तर त्यांच्या अढळ विश्वासावर. एक व्यक्ती जी सदैव माझ्या पाठीशी उभी होती. सर्व ठीक होईल, काळजी करू नकोस असे ते सांगायचे. त्यांच्या याच शब्दांसाठी त्यांना भेटण व्हायचं, खूप आधार वाटायचा.
प्रत्येक गोष्टींच सोल्युशन तिथ मिळायचं. माझी श्री स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे याची त्यांना कल्पना होती. माझी माझ्या जीवनातील दिवसेंदिवस होणारी प्रगती, मला मिळालेली बक्षिसे, माझा इतर ठिकाणी होणारा सन्मान व माझ्या मुलांना पाहून त्यांना होणारा आनंद. तसाच त्यांच्या चेहरा डोळ्यांसमोर येतोय अगदी प्रसन्न. त्यांच्याविषयी सांगताना खर तर माझ्याकडे तशी प्रगल्भ वाणी नाही किंवा सुरेख शब्दसौंदर्य नाही तरीही माझ्या शब्दात मला जे कळालेत ते मी व्यक्त करते.
सद्गुरू म्हणजे साक्षात यशाचा वरदहस्त. सद्गुरू म्हणजे जीवनात येणार्या संकटांना तोंड देण्याच सामर्थ्य देणारी एक शक्ती. सद्गुरू म्हणजे एक अशी परमशक्ती जी सतत विवेकातून योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य करते. सद्गुरू म्हणजे एक विश्वास जो माणसाला देवत्वाकडे नेण्याचे कार्य करतो. सद्गुरू म्हणजे जे चांगल्या जीवनासाठी मार्ग तयार करतात आणि आपल्याही नकळत आपल्यातील अवगुण काढून टाकतात. जीवनाचा उद्धार करणारी अफाट शक्ती म्हणजेच सद्गुरू! लाभले आम्हास भाग्य, असे सद्गुरू मिळाले आम्हास!! ज्यांच्या पदस्पर्शाने अन आशीर्वादाने सफल झाला हा जीवनप्रवास!! दरवर्षी दादा महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतो. त्यांच्या दर्शनासाठी मी तिथे जायचे त्यांना पाहून खूप समाधान वाटायचे त्यांच्या भेटीनंतर वेगळी स्फूर्ती मिळायची. गेल्या 2 वर्षात त्यांची तब्ब्येत ठीक नसल्याने क्वचितच भेट व्हायची. परंतु त्याचं असण आमच्या सर्व साधक बंधू भगिनींसाठी खूप मोलाचं होत.
आज जरी ते नसले तरी त्यांच्या आदर्श तत्वावर आम्ही मार्गक्रमण करूच. सगुण रूपातील त्यांच्या आठवणींचा ठेवा सतत आमच्या जवळ असेल व कायम स्मरणात राहील. लौकीकापासून नेहमी दूर असणारे सर्वांचे सर, बाबा, ज्योतिषशास्त्रात पारंगत असणारे, जन्मपत्रिका तयार करून देणारी फलटणकरांची सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे प्रा.दीक्षित सर. समाजातील कित्येक लोकांचे प्रश्न मार्गी लावणारे, क्षणात सर्वकाही सांगणारे, काही क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे कसलाही संभ्रम न करता तत्काळ सर्व बाबी सांगणारे फलटणमधील अतिशय बुद्धिमान व ज्योतिषविशारद व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.प्रभाकर दीक्षित सर. त्यांच्या जाण्याने फलटणकरांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती उणीव कुणीच भरून काढू शकत नाही.
प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या काळातील ही आसामी म्हणजे मुधोजी महाविद्यालयाचे मराठीचे प्रगल्भ प्राध्यापक व सद्गुरू गुळवणी महाराजांचे शिष्य, ज्योतिषशास्त्राचा प्रगाढ पंडीत असणारी विभूती आज आपल्यात नाही याचे दु:ख होत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो. त्यांना चिरंतन शांती लाभो!! या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरुचरणी शतश: नमन!!!
– सौ. संध्या गायकवाड,
संचालक । सरस्वती शिक्षण संस्था.