शिवाजीनगर येथील मतिमंद मुलांच्या शाळेत पालक स्नेहमेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी लायन्स क्लब गोल्डन ग्रुप फलटण आणि महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा, शिवाजीनगर फलटण यांचे संयुक्त विद्यमाने सकाळी ११.०० वाजता पालक स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पुणे येथून प्रमुख पाहुणे प्रा. सौ. कृष्णा पंत (स्पेशल पालक एज्युकेटर) तसेच श्री. अमिताभ पंत यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार संस्थेच्या सचिव सौ. स्वाती चोरमले यांनी केला.

यावेळी सौ. रूची भल्ला (लेखिका) या उपस्थित होत्या. त्यांनीही पालकांना मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार संस्थेच्या विशेष शिक्षिका सौ. सुनिता गायकवाड यांनी केला. संस्थेचे अध्यक्ष संदीप चोरमले यांनी शाळेची माहिती पाहुण्यांना सांगितली. या विद्यार्थ्यांसाठी सौ. कृष्णा पंत या स्वतः प्राध्यापिका असून त्यांचा स्वतःचा मुलगा ऋतुराज हा दिव्यांग (मतिमंद) आहे. त्याला वयाच्या ८ ते १० वर्षापर्यंत काहीच समजत नव्हते; परंतु तो आज अतिशय चांगले जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून दिव्यांग मुलांसाठी उपयुक्त एक चित्र स्वरूपात पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये मुलांच्या दैनंदिन गरजेनुसार त्या मुलाशी निगडीत सर्व चित्रं त्या पुस्तकात घेतली आहेत. हे पुस्तक कसे मुलांना फायदेशीर आहे मुलांना हे पुस्तक कसे वापरायचे याची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली. आज दिव्यांग (मतिमंद) मुलं त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड देत असतात, अशावेळी आपल्या मुलाचं पुढे काय होणार? कसे होणार? अशा काळजीत पालक नेहमीच असतात; परंतु या चित्र पुस्तकामुळे मुलांना निश्चित चांगली मदत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी लायन्स गोल्डन ग्रुप फलटणच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार महात्मा शिक्षण संस्था मतिमंद मुलांची शाळा अध्यक्ष श्री. संदिप चोरमले यांनी केला व शाळेविषयी सविस्तर माहिती दिली. शाळेला नेहमी मदत करणार्‍या दानशूर व्यक्तींचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा ला. प्राध्यापक सौ. नीलम देशमुख यांचा सत्कार श्री. अमित राऊत यांनी केला. प्रमुख पाहुणे अमिताभ पंत यांनी पालकांना सविस्तर मार्गदर्शन करून मुलातील सुधारणा कशा ओळखाव्यात, याचे महत्त्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ला. सौ. निलम देशमुख (अध्यक्षा, लायन्स गोल्डन ग्रुप फलटण) यांनी शाळेचे, विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी ला. सौ. उज्ज्वला निंबाळकर (चार्टर्ड अध्यक्षा, लायन्स गोल्डन ग्रुप फलटण), ला. सुनंदा भोसले (माजी अध्यक्षा, लायन्स गोल्डन ग्रुप फलटण), ला. सौ. सुनीता कदम (माजी अध्यक्षा, लायन्स गोल्डन ग्रुप फलटण) या उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन श्री. रमेश लालसरे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमित राऊत सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शाळेच्या विशेष शिक्षिका सौ. सुनीता गायकवाड, राधिका माळवे, पूजा कडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महिला व पालकांनी तसेच संस्थेच्या सचिव सौ. स्वाती चोरमले व विशेष शिक्षिका सौ. सुनीता गायकवाड यांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

याप्रसंगी पालक व मुलांना खाऊवाटप करण्यात आला. मुलांचा आनंद पाहून उपस्थित पाहुणे भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी बनवलेल्या वस्तू उपस्थित सर्वांना भेट म्हणून दिल्या. हा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात पार पडला.


Back to top button
Don`t copy text!