स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शहराची हद्दवाढ प्रलंबित राहिलेली आहे. ही हद्दवाढ करण्यासाठी दोन वेळा प्रस्ताव पाठवण्यात आले. प्रस्तावानुसार अधिसुचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार हरकतीही नोंदवण्यात आल्या होत्या. केवळ नगरविकास विभागाकडून एक आदेश निघणे उरले होते. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या फाईलवर सही करतो असे सातारकरांना जाहीर सभेत सांगितले होते. त्यांचे ते आश्वासन गेले कुठे?, सरकार बदलताच नव्याने पुन्हा प्रस्ताव द्यावा लागणार आहे, अशी शक्यता नुकतीच व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या प्रस्तावाबरोबर तुमच्या साताऱयाचा करुन टाकतो, असे पत्रकारांशी बोलताना परवा सांगितले.
शहराच्या हद्दवाढीचे घोंगडे हे कित्येक वर्षापासून भिजत पडलेले आहे. शाहुनगर व त्या लगतचा काही भाग, आकाशवाणी झोपडपट्टी, शाहुपूरी, महादरे यासह खेडचा काही भाग नियोजित हद्दवाढीत होता. भाजपा सरकारच्या कार्यकाळात शहराच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने प्रस्तावाची फाईल मंत्रालयात नगरविकास विभागात सही वाचून अडकली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती मागवण्यात आल्या होत्या. तात्कालिन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हरकती ऐकून घेण्यासाठी एका अधिकाऱयांची नेमणूकही करण्यात आली होती. त्या अधिकाऱयांने हरकती ऐकून घेवून तसा अहवाल ही पाठवण्यात आला होता. ज्या त्रुटी होत्या त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये कळवण्यात आल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही वारंवार त्यावर मंत्रालयात बैठका घेवून पाठपुरावा केला. तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा साताऱयात प्रचाराला आले होते. तेव्हा साताऱयाच्या हद्दवाढीच्या फाईलवर सही करतो, असे निक्षून सांगितले होते. त्यावर पुन्हा हा प्रश्न भिजत पडला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱयात आले असता त्यांना पत्रकारांनी छेडल्यानंतर ते म्हणाले, साताऱयाच्या हद्दवाढी पहिला प्रस्ताव, दुसरा प्रस्ताव आणि तिसरा प्रस्ताव असे सगळे प्रस्ताव पाठवून द्या. बारामतीच्या हद्दवाढीबरोबरच साताऱयाचीही हद्दवाढ वाढवून टाकतो, असे सांगितले होते. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीचे झेगांट आता तरी सुटणार काय?, असा सातारकरांना सवाल पडू लागला आहे.