सामाजिक जाणीवेसह संवेदना जपणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. अनिल अवचट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । सातारा । “माणसं हुशार असतात, माणसं बुद्धिमान असतात, मात्र माणसं संवेदनशील असतीलच असं नाही” अशी मांडणी करत आपली संवेदना जपून माणुसकीची शिकवण देणारे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते,सिद्धहस्त लेखक, पत्रकार, महाराष्ट्राला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेणारे डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले. एक कलाकार, शिल्पकार, संगीताची आवड आणि सामाजिक जाणीवेसह संवेदना जपणारे बहुआयामी आणि व्यासंगी व्यक्तीमत्व आज आपल्यातून गेले.

आठ भावंडांमध्ये सर्वांत मोठे होते. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणून शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये पाठवले. तिथे ते वसतिगृहात राहून शिक्षण घेऊ लागले. १९५९ ला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. कॉलेजच्या जीवनामध्ये तिथेच सुनंदा यांच्याशी त्यांची भेट झाली. मैत्री झाल्याने त्यातूनच त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.

डॉ. अनिल अवचट यांना वैद्यकीय क्षेत्रात विशेष रस नसल्याने ते सामाजिक कार्याकडे वळले. सामाजिक क्षेत्रातील अनुभव त्याचा समाजमनावर होणारा परिणाम यावर त्यांनी साधना साप्ताहिकातील वेध सदरामध्ये विपुल लेखन केले. साप्ताहिक साधना व पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे ते त्यांनी संपादनही केले. १९५९ यामध्ये प्रकाशित केल्याने पूर्णिया हे पहिले पुस्तक त्यांनी युवक क्रांती दलाला अर्पण केले. यात त्यांनी बिहारच्या समाज जीवनाविषयी विस्तृत माहिती वजा चित्रण केलं आहे. त्या ठिकाणचे दु:ख दैन्य समाजजीवनातील वास्तववादी घटनाप्रसंग यातून त्यांनी निष्ठेनं काम करणार्‍या एका समाजवादी युवकाच्या प्रतिकार शुन्य लढ्याचं वर्णन केला आहे. आज त्यांची बावीस पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कार्यरत, स्वतःविषयी, गर्द, जिवाभावाचे, दिसले ते, छंदांविषयी,आप्त, सरल तरल, सृष्टीत… गोष्टीत, रिपोर्टिंग चे दिवस, लाकूड कोरताना, अमेरिका, माझ्या लेखनाची गोष्ट, संवाद, कुतूहलापोटी ही काही त्यांची निवडक पुस्तके आहेत.

अनिल अवचटांनी आपल्या लेखनातून वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली. साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कार्यानंतर किंबहुना त्यासोबतच त्यांनी व्यसनमुक्त समाजाचा स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी ‘मुक्तांगण’ नावाची संस्था पुण्यामध्ये उभारली. व्यसनाने भरकटलेल्या जीवन उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंतच्या व्यक्तींना याठिकाणी प्रवेश असतो. अनेकांना उद्ध्वस्त होण्यापासून याच मुक्तांगण सेंटरने वाचवले आहे.

पत्रकार म्हणूनही त्यांनी आपल्या लेखनातून एक विशिष्ट ठसा उमटवला आहे. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय, अर्थशास्त्रीय विचारांचा समाज मनावर होणारा परिणाम व समाजातील वास्तव आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

शिल्पकला, चित्रकला, उत्कृष्ट फोटोग्राफी, बाल चिमुकल्यांसाठी ओरोगामीतून विविध प्रकारचे आकार त्यांनी तयार केले. यासंबंधी त्यांनी पुस्तक ही प्रकाशित केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या मधील छंद आवडीनिवडी जपल्या आहेत. आपल्या आवडीनिवडी, छंद त्यांनी समाजभिमुख बनवले. त्यांनी कायमच समाजातील विषमता, दारिद्र्य, दु:ख, दैन्य या विषयी आपली मांडणी केली. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठीच समर्पित होते. असा संवेदनशील मन जपणारा पुरोगामी विचारांचा वारसा समर्थपणे चालवणारा साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार आज काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या ७८ या वर्षी आपल्या पुण्याच्या राहत्या घरी डॉ. अनिल अवचट त्यांनी शेवटचा श्वास घेतला.त्यांच्यावर पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्यानं एका समाजवादी विचारांचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे.


Back to top button
Don`t copy text!