स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक भव्यदिव्य स्वरुपात उभारावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । मुंबई । वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजुरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे येथील स्मारकाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (व्हीसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हीसीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख (व्हीसीद्वारे), वढूचे माजी सरपंच अनिल शिवले, अंकुश शिवले उपस्थित होते.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढु बुद्रुक येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा, स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तूरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे. या स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. या क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसेच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचे स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा. स्मारक उभारणीचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊनच काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!