
सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन विकास गोसावी,विठ्ठल बलशेटवार, धनंजय जांभळे, सिद्धीताई पवार
स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा : स्वराज्य स्थापन करण्याची स्फूर्ती आणि शक्ती ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली, त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन प्रेरणा दिली त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि ज्यांनी राज्यकारभाराचा एक आदर्श निर्माण केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे सातारा शहरात उभे करून समाजासाठी आदर्श निर्माण करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी सातारा शहराध्यक्ष, सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रमुख विकास गोसावी यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांच्याकडे केली.
सातारा शहर हे महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासात स्वराज्य, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे महत्त्वाचे केंद्र राहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या या भूमीवर राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणार्या महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे. या अनुषंगाने सातारा शहरातील पोवई नाका परिसरात, सभापती निवास या सार्वजनिक व मध्यवर्ती ठिकाणी होणार्या विकास कामांच्या प्रांगणात , राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य व देखणे पूर्णाकृती पुतळे उभे करून समाजाला आदर्श मिळेल असे स्मारक सातारा व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे विकास गोसावी यांनी केली.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या मूर्तिमंत जननी होत्या. त्यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडला. स्वधर्म, स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा यांचे संस्कार समाजात रुजविणार्या जिजाऊ मातांच्या पुतळ्यामुळे मातृशक्तीचे महत्त्व अधोरेखित होईल व भावी पिढीला प्रेरणा मिळेल.
झाशीची राणी लक्ष्मीबाई या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्याचे प्रतीक आहेत. 1857 च्या स्वातंत्र्यसमरात त्यांनी दाखविलेले धैर्य, पराक्रम आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. स्त्री ही केवळ सहनशील नसून, देशरक्षणासाठी रणांगणात उभी राहू शकते, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यांच्या पुतळ्यामुळे युवकांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि निर्भीड नेतृत्वाची भावना निर्माण होईल. यांचे माहेर सातारा शहरा जवळील धावडशी हे गाव असल्याने त्यांचे स्मारक सातारा शहरात होणे आवश्यकच आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी शासक म्हणून इतिहासात अढळ स्थान प्राप्त करून आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत धर्म, न्याय, विकास आणि लोककल्याण यांचा उत्तम समन्वय साधला. मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणीपुरवठा व्यवस्था उभारून त्यांनी समाजासाठी दीर्घकालीन विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या पुतळ्यामुळे सुशासन, प्रामाणिक प्रशासन आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित होईल.
या तीन महान वीर मातांचे पूर्णाकृती पुतळे एकाच ठिकाणी उभारल्यास नारीशक्ती, नेतृत्व, त्याग आणि राष्ट्रसेवा यांचा एकत्रित संदेश समाजाला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हे एक खुले प्रेरणास्थान ठरेल, महिलांसाठी आत्मसन्मान व सशक्तीकरणाचा संदेश देईल आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देईल. तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडून सांस्कृतिक व पर्यटनदृष्ट्याही या ठिकाणाचे महत्त्व वाढेल.
पोवई नाका परिसरातील सभापती निवास हे ठिकाण सार्वजनिक, मध्यवर्ती आणि वर्दळीचे आहे, त्या ठिकाणी होणार्या विकास कामांच्या प्रांगणात उभारण्यात येणारे पुतळे सर्वसामान्य नागरिकांच्या सतत संपर्कात राहतील. सुबक चौथरा, माहिती फलक, प्रकाशयोजना व सुशोभीकरणासह हे स्मारक उभारल्यास सातारा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ मिळेल.
वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार करता, सातारा शहराच्या गौरवशाली परंपरेस साजेशी आणि भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे हे स्मारक त्वरित मंजूर करून आवश्यक प्रशासकीय व आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याची विनंती नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे विकास गोसावी यांनी केली , निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री माननीय नामदार जयकुमारभाऊ गोरे, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि सातारा नगरपालिका नगराध्यक्ष अमोल जी मोहिते यांच्याकडे देण्यात आली
यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार , नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका सिद्धीताई पवार, नगरसेविका प्राचीताई शहाणे, नगरसेविका आशाताई पंडित, नगरसेविका शुभांगी काटवटे, विक्रम बोराटे, सूर्यकांत पानसकर, तानाजी भणगे, विजय काटवटे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे , नितीन कदम, विक्रांत भोसले उपस्थित होते.
