फलटण येथील लोकमान्य पतसंस्थेतील कर्जदार व ठेवीधारकांचा लवकरच मेळावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील लोकमान्य पतसंस्थेच्या कर्जदार व ठेवीदार यांच्या मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञ, विधीतज्ज्ञ, माजी सहकार विभागातील अधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कर्जदार व ठेवीदारांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मेळाव्यासाठी सर्व कर्जदार व ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

फलटण येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांचे मुदत पूर्ण झाल्यानंतरही आणि काहींची मुदत पूर्व मागणी असतानाही ठेवीच्या रकमा परत केल्या नाहीत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी होत आहे.

लोकमान्य पतसंस्थेत ठेवी असलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून पतसंस्थेच्या कर्जवसुली व ठेवी वाटपामध्ये अफरातफर व अनियमितता झाल्याची तक्रार काही कर्जदार व ठेवीदार यांनी केली आहे. त्यामुळे संचालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आर्थिक गुन्हे विभागातर्फे तपासणी करण्याची मागणी होत आहे. कर्जदार व ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात यावेत, शासनाकडून लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता असून क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप केल्यामुळे व कर्जाची वसुली झालेली नाही, त्यामुळे संस्था अडचणीत आली आहे, असा ठेवीदारांचा सूर आहे.

थकित कर्जदार यांच्याकडून बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने कर्जवसुली सुरू असून ठेवीदार ज्येष्ठता यादीनुसार कर्जवसुलीनुसार ठेव वाटप होत नसून लोकमान्य संस्था बेकायदेशीर कर्जवसुली व ठेव वाटप प्रकरणी जबाबदार व्यक्तींचे विरोधात गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे कर्जदार व ठेवीदार यांनी सांगितले आहे. अनेक थकित कर्जवसुलीदरम्यान बेकायदेशीर तडजोडी झाल्या असल्याचा आरोप होत आहे. याबाबत सहकार आयुक्त यांनी चौकशी करावी. आजअखेर किती थकित कर्जवसुली झाली त्याचे वाटप ठेवीदार यांना नियमाप्रमाणे झाले का, असा सवाल विचारला जात आहे.

नियमबाह्य कर्जवसुली व वसुली झालेल्या रकमेतून नियमबाह्य ठेवीवाटप होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. आजअखेर गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले होते. ठेवीदारांनी भरपूर अवधी संस्थेस दिला आहे; परंतु त्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे पतसंस्था परत करू शकली नाही. एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांना आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवायची आहे. कर्जदार व ठेवीदार यांच्या एकत्रित एका मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!