स्थैर्य, बुलडाणा, 19 : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउनचा चौथा टप्पा लागू झाला आहे. सर्वच ठिकाणी कडक नियम पाळलले जात आहे. अशा परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यात एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील दोन चिमुकल्यांसह एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दुसरबीड येथील 28 वर्षीय स्वाती अमोल जगदाळे ही विवाहित 17 मे च्या रात्रीपासून 11 वर्षीय मुलगा गणेश आणि 9 वर्षीय मुलगी मयुरी ह्यांना शौचास नेते म्हणून घरातून बाहेर गेली होती.
खूप वेळ होऊनही ती घरी परतली नाही. म्हणून कुटुंबीयांसह इतर लोकांनी रात्रभर शोध घेतला. तसंच काल दिवसभर तिघांचाही पुन्हा शोध घेण्यात आला. कुठल्या नातेवाईकाकडे तर ही महिला गेली नाही, अशी विचारपूसही करण्यात आली. परंतु, कुठेच तिचा पत्ता लागला नाही.
शेवटी आज सकाळी दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
यासंदर्भात माहिती मिळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर मृतक महिलेचा पती अमोल जगदाळे ह्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मात्र, या तिघांसोबत काही घातपात घडला की, ही आत्महत्या आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.