दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मुंबई शहरातील जुहू आणि दहीसर येथे असलेल्या भारतीय विमान प्राधिकरणाच्या रडार यंत्रणा गोराई परिसरात हलवण्याबाबत विचार सुरु असून याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये सदस्या मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय विमान प्राधिकरणाच्या रडार यंत्रणेमुळे काही विशिष्ट उंचीच्या वर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असे निर्बंध आहेत. मात्र या रडार यंत्रणा गोराई येथे हलवण्याबाबत केंद्र सरकारच्या विभागाशी संपर्क साधला जात आहे. त्याचबरोबर याबाबत मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल.
लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
याबाबत सदस्या मंदा म्हात्रे, अभिमन्यू पवार, योगेश सागर यांनी चर्चेत सहभाग घेतला.