वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यासह एक होमगार्ड निलंबित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये घुसून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यासहित एका होमगार्डला निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. दरम्यान, पोलीस मारहाणीच्या निषेधार्थ शिरवळसह राज्यामधील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत पोलीसांना पोलीस सेवेमधून बडतर्फ करण्याची मागणी करीत आंदोलन चालूच ठेवले आहे.

याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. दरम्यान,९ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे,बी.सी.दिघे,चालक डी.ए. धायगुडे, होमगार्ड मनोज नरुटे यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश करीत वसतिगृहातील रूममध्ये असणाऱ्या तब्बल १७ विद्यार्थ्यांना अमानुषपणे काठीच्या साहाय्याने जोरदार विनाकारण मारहाण केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीमुळे काठ्यांचे व्रण उठले असून आज शिरवळ पोलीसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरवळ क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी, उदगीर, मुंबई, नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी निदर्शने करीत जोरदार आंदोलन करीत पोलीसांच्या कारवाईच्या निषेधार्थ संबंधितांना पोलीस सेवेमधून बडतर्फ व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक रहिवाश्यानी वसतिगृहातील विद्यार्थी गोंधळ घालत आहे अशी तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस वसतिगृहात गेल्यानंतर सदरील गोंधळ व मारहाण झाल्याची माहिती शिरवळ पोलिसानी दिली आहे.

दरम्यान, यावेळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे,शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी विद्याथ्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, बी. सी. दिघे, चालक डी. ए. धायगुडे, होमगार्ड मनोज नरुटे यांना निलंबित केल्याचे लेखी आदेश विद्यार्थ्यांना व महाविद्यलयाला उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी दिल्यानंतर विद्यार्थी यांनी नरमाईची भूमिका घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पालक आल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू असे संगत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत आंदोलन चालूच ठेवले. दरम्यान, संपूर्ण प्रकारांची चौकशीकरिता वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे-खराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!