
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । कोयना धरण क्षेत्रातील पुनर्वसितांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी धरणग्रस्तांचे नेतेडॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये एक हजाराहून आंदोलक सहभागी झाले होते . पुनर्वसितांचा हा प्रश्न सोडवण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर बैठक लावावी अशी मागणी यावेळी डॉक्टर पाटणकर यांनी केली.
डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना लाभक्षेत्रातील धरणग्रस्तांनी राजवाडा येथून भव्य इशारा मोर्चा काढला . या मोर्चाची दुपारी साडेबाराच्या दरम्यान सुरुवात झाली. जमीन हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा देत धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी युवा मोर्चा आघाडीचे चैतन्य दळवी देवानंद शिंदे आणि त्यांचे विविध सहकारी यावेळी उपस्थित होते.
हा मोर्चा राजपथावरून मोती चौक देवी चौक शाहू चौक पोवई नाका तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले या मोर्चाला मार्गदर्शन करताना डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्व विषय चर्चेअंती अंतिम झाले होते येथील खरे धरणग्रस्त अडीच हजार ते 2700 असताना अंशतः जमीन धारक पंधराशे 2000 धरणग्रस्त असे आकडे निश्चित होत आहेत धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट बनवण्यात आली आहे त्यामुळेच हा प्रश्न शासकीय पूर्वग्रहातून जटिल बनला आहे कोयना धरणाचे पाणी सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये जाते आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रातील जमिनी देण्याची धरणग्रस्तंना प्रक्रिया ठरलेली असताना त्यामध्ये सुद्धा बरेच बदल झालेले आहेत त्यामुळे कोयना धरणग्रस्त 62 वर्षानंतर आजही कायम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोयना धरणग्रस्त आहेत त्यांना या प्रश्नाची आंतरिक तळमळ आहे त्यामुळे हा प्रश्न तत्काळ वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून सोडवला जावा अशी मागणी डॉक्टर भारत पाटणकर यांनी यावेळी केली यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित न झाल्यास यापुढे सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सनदशीर मार्गाने धरणग्रस्तांचे भव्य इशारा मोर्चे चालूच राहतील असा इशारा डॉक्टर पाटणकर यांनी दिला आहे.