दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२३ | फलटण |
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासासाठी मंगळवारी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटण व मलटणमधील रस्ते व इतर सुविधांसाठी ७ कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
याबाबत माहिती देताना जाधव म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, नातेपुते, माळशिरस, म्हसवड, माढा, महाळुंग, या नगरपंचायत व नगरपरिषद यांना ३ कोटी रुपये असा निधी मंजूर केला आहे. यामुळे या मतदारसंघांमध्ये विकासकामाला चालना मिळणार आहे. फलटण शहरांमध्ये रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. हे सर्व फलटणकर जनता पाहत आलेली आहे. यापूर्वीच्या सत्ताधार्यांनी फलटण शहराच्या विकासासाठी काहीही काम केले नाही. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादीबाबत प्रचंड नाराजी आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विविध पद्धतीने निधी उपलब्ध करून या शहरांच्या विकासासाठी काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या शहराच्या विकासासाठी पालखी महामार्गअंतर्गत १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तीही कामे लवकरच सुरू होतील.
राज्य शासनाने फलटण शहराच्या विकासासाठी नगरपरिषद क्षेत्रातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे, दहाव्याच्या विधीसाठी दत्त घाट, मंदिराला कंपाऊंड, लोहार समाजासाठी सभा मंडप, समाज मंदिर, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन, बेलदार समाजासाठी सभागृह, मारवाड पेठेमध्ये अभ्यासिका, लिंगायत स्मशान समाजासाठी स्मशानभूमीस कंपाउंड, वीर जीवा महाले स्मारक चौथारा, गटर लाईन, काँक्रिटीकरण करणे, आनंदनगर येथे ओपन स्पेस मध्ये नाना-नानी पार्क बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, चांदतारा मुस्लिम मस्जिद मध्ये सभागृह बांधणे, खाटीक गल्लीत सभा मंडप, शिवाजीनगर येथे व्यायाम शाळा बांधणे, वडार समाजासाठी समाज मंदिर बांधणे, मळजाई मंदिर समोर ओपन स्पेसमध्ये बगीचा तयार करणे, श्री ग्राहक बाजार शेजारी ओपन स्पेसमध्ये बगीचा तयार करणे, धनलक्ष्मी अपार्टमेंट शेजारील ओपन स्पेसमध्ये सामाजिक सभागृह बांधणे, संजीवराजे घर ओपन स्पेसमध्ये नाना-नानी पार्क बांधणे, माणकेश्वर मंदिराशेजारी सुशोभीकरण करणे, शंकर मार्केट मुंबई सुशोभीकरण करणे, जैन मंदिर मागे वडार वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे, अशा अनेक गोष्टींसाठी या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
हा निधी मंजूर झाल्यामुळे फलटण व मलटण शहरांतील रस्ते व इतर बाबी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत व शहरांच्या विकासासाठी यामुळे नक्कीच चालना मिळणार आहे. यामुळे फलटण शहराच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.