दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण | ‘स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी श्री गुरूचे आशिर्वाद लागतात’, या उक्तीप्रमाणे पांजरपूर शाळा क्र. ४ मधील सर्व विद्यार्थ्यांनी श्री गुरूचे ऋण तसे आपण फेडू शकत नाही, पण एक कृतज्ञता म्हणून सर्व मुलांनी ‘गुरू-शिष्यां’च्या भेटीचा स्नेहमेळावा आयोजित केला होता.
हा स्नेहमेळावा नवलबाई मंगल कार्यालयात १४ मे रोजी संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांना स्नेहमेळाव्याचे निमंत्रण दिले होते. विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नवलबाई मंगल कार्यालयात सर्व शिक्षकांचे आगमन होताच सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर फुलांचा वर्षाव करून पायघड्या अंथरूण शिक्षकांना स्टेजवर बसण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन केले. तसेच शाल, श्रीफळ, गुलदस्ता देऊन स्वागत करण्यात आले. श्री. नामदेव डुबल सर, सौ. अलका भोसले मॅडम, सौ. कृष्णाबाई केंजळे मॅडम, श्री. कांतीलाल सपकाळ सर, शकुंतला कर्वे मॅडम हे शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या सत्कारानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांची मनोगते ऐकून विद्यार्थ्यांचेच नाही तर शिक्षकांचेही डोळे पाणावले होते. रूपाली हाडके, पूनम मठपती, श्याम जामोदेकर यांनी खूप छान मनोगत व्यक्त केले.
गुरूजनांनीही आपल्या शाळेबद्दल, मुलांबद्दल भावना व्यक्त केल्या. मनोगतानंतर मोनिका हाडके हिने नृत्य केले. हे नृत्य पाहून सर्वांना आपल्या शालेय जीवनात असल्यासारखे वाटले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले.
नेटक्या नियोजनामुळे ‘गुरू-शिष्यां’चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.