स्थैर्य, श्रीनगर, दि.२५: काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी गुरुवारी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं. यामधील एक दहशतवादी पाकिस्तानचा होता. तर दुस-याचं नाव आमीर सिराज असून तो कॉलेज विद्यार्थी आणि फुटबॉलर होता. दोघांचेही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. आमीर २ जुलै २०२० पासून बेपत्ता होता.
सोपोर येथील पोलीस अधिका-याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, आमीर सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झला होता. ‘आमीर फुटबॉल खेळण्यासाठी सोपोर येथील मामाच्या घरातून बाहेर पडला तेव्हापासून बेपत्ता आहे. तो पुन्हा घरी परतलाच नाही. नंतर तो जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळाली. आमीरचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता. पण तो सोपोरमधील ज्या परिसरात राहत होता तिथे अनेकांनी दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला आहे’.
बारामुल्ला येथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, सीआरपीएफकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली. दहशतवादी घरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली.
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठार झालेल्या एका दहशतवाद्याचं नाव अबरार असं असून तो पाकिस्तानचा आहे. तर दुस-याचं नाव आमीर सिराज असून सोपोरचा रहिवाली आहे. दोघेही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. दोघेही अनेक दहशतवादी घटनांमधअये सहभागी होते’. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.