दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
३० एप्रिलच्या आत जे गाव प्रत्येक बुथवर भाजपाचे ५० सदस्य सरल अॅपमध्ये नोंदणी करतील तसेच संपूर्ण बूथ सशक्तीकरण अभियान यशस्वीपणे राबवतील त्या गावाला पाच लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ सशक्तिकरण अभियान व शक्ति केंद्रप्रमुख आणि पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, लोकसभा कोअर कमिटी सदस्य विश्वासराव भोसले, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, अॅड नरसिंह निकम, मंडलाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, मी मतदार संघातील जनतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मी तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध असून पक्षाने आपल्याला इतकी मोठी ताकद दिल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले काम करावे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी बुथ व शक्ति केंद्र अभियान यशस्वीपणे राबवावे. जे गाव ३० एप्रिलच्या अगोदर प्रत्येक बूथवर ५० सदस्य व सरल अॅपमध्ये नोंदणी करतील तसेच संपूर्ण बुथ सशक्तिकरण अभियान यशस्वी राबवतील त्या गावाला पाच लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल.
पुण्याचे माजी महापौर व भाजपाचे युवा नेते मुरलीधर मोहोळ मार्गदर्शन करताना म्हणाले की, संघटनेच्या एकीच्या जीवावर भाजपने देशात व राज्यात सत्ता मिळवली. आगामी काळात बुथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून गावागावामध्ये संघटना बळकट करा, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले आहे. भाजपामध्ये संघटनात्मक काम कायम सुरू असते. संघटना ही ‘शक्ती’ म्हणून गाव पातळीवर कायम काम करत असते. पक्षामध्ये शक्ती केंद्रप्रमुख याचे काम महत्त्वपूर्ण आहे. तसेच ‘बूथ अध्यक्ष’ हा पक्षाचा मुख्य कणा आहे. यावेळी आपल्याला ५१ टक्के मते घ्यायची आहेत, त्यामुळे बूथवर तीस लोकांच्या सदस्यांची यादी करून त्यांना सरल अॅपमध्ये नोंदणी करायची आहे. तसेच त्या ग्रुपमध्ये ‘मन की बात’ प्रमुख, व्हाट्सअॅप ग्रुप प्रमुख, सोशल मिडिया प्रमुख, केंद्रीय व राज्यस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावांमध्ये ग्रुप तयार करून केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करावे.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रातून व राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचून आणला आहे. त्यामुळे गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत सोशल मीडियामार्फत पोहोचवावी व भविष्यातील राजकारणासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी बूथ अभियान यशस्वी करावे, असे आव्हान मुरलीधर मोहोळ यांनी केले.
यावेळी जयकुमार शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण कार्याचा आढावा दिला व हे अभियान यशस्वी करू, असे सांगितले.
या कार्यक्रमास स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, महिला अध्यक्षा उषा राऊत, धनंजय पवार, सुनील जाधव, बबलू मोमीन, रियाज इनामदार, राजेंद्र काकडे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी स्वागत केले व माहिती दिली. प्रास्ताविक संतोष सावंत यांनी केले व आभार शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मानले.