स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, ता.22, (रणजित लेंभे) : वाघोली (ता. कोरेगाव) येथे मुंबईहून आलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यासोबत प्रवास केलेल्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मुंबई-पुणेकरांमुळे ग्रामीण भागात कोरोना भूकंपाचे धक्के वाढू लागले असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई-पुण्यात नोकरी निमित्ताने स्थायिक असलेले चाकरमानी आता गावाकडे येऊन गावकऱ्यांच्या जीवाला घोर लावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरेगावच्या उत्तर भागात सोनके येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याचा व त्याच्या सहवासातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सोनकेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. सरकारने मुंबई-पुणे येथून गावाकडे जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळे दररोज शेकडो चाकरमानी गावच्या वेशीवर धडकत आहेत. अनेकांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. वाघोलीतील रुग्ण मुंबईत (परळ) येथे बीईएसटीमध्ये वाहक म्हणून नोकरीस आहे. आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी व बनवडीतील विवाहित मुलगी व जावई यांच्यासमवेत तो बुधवारी रात्री गावी आला. त्यानंतर मुलगी व जावई बनवडीला गेले. वाघोलीतील सर्वांना गावातील स्वतंत्र घरात ठेवण्यात आले होते. वाघोलीत येण्यापूर्वी मुंबईतच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. आज सकाळीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी सांगितले. ही माहिती सकाळी-सकाळी गावात समजली अन सगळा गावच थबकला. या रुग्णाचा गावात संपर्क न आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याला सकाळी ११ वाजता उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून याच्यासोबत प्रवास केलेल्या कुटुंबीयांना ब्रम्हपुरी (ता.कोरेगाव) येथील विलगकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी गाव सील केले असून कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे.