स्थैर्य, सातारा, दि.२: दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात सिमेंटचा पोल घालून जखमी केल्याची घटना ब्राम्हणवाडी (ता.सातारा) येथे घडली. याप्रकरणी शामुबेल दत्तू पाखरे (रा.शेगाव, जि.जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू मुरलीधर पाखरे (रा.शेगाव,जि.जालना) याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी व संशयित हे जालना जिल्ह्यातील असून ते मजुरीसाठी ब्राम्हणवाडी येथे आले आहेत. दि. २० रोजी संशयित राजू हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याची फिर्यादीसोबत किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणातून संशयिताने शेजारी पडलेला सिमेंटचा पोल उचलून फिर्यादीच्या डोक्यात घातला. त्यामुळे फिर्यादी हे बेशुध्द झाल्याने व त्यांच्या डोक्यात जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर दि. ३१ रोजी शामुबेल यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित पसार झाला आहे.