स्थैर्य, मुंबई, दि. २७: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि वनमंत्री संजय राठोर यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक झालेली होती. आता या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर लावण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)हा गुन्हा दाखल केला. किशोर वाघ यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही बेहिशोबी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणामध्ये 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक झाली होती. यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
पोलिसांनी तपास केल्यानंतर किशोर वाघ यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या उत्पन्ना पेक्षा 90 टक्के अधिक ही रक्कम होती. त्यानंतर एसीबीने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.