स्थैर्य, सातारा, दि.०५: पोवई नाक्यावरील ग्रेडसेप्रेटरमध्ये दुचाकीवरून जीवघेणे स्टंट करून त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करणार्या युवकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतूराज राजेंद्र करंजे वय 27 रा. दौलतनगर, करंजे तर्फ ता. सातारा असे त्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, ग्रेडसेप्रेटर मार्गावर अनेक दुचाकीस्वार उलट दिशेने वाहने चालवणे, भरधाव वेगात जाणे, स्टंटबाजी करणे असे प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रुतूराज यानेही ग्रेडसेप्रेटर मार्गात जीवघेणी स्टंटबाजी करुन आपल्या मित्रांचे सहकार्याने त्यांचे चित्रीकरण करुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रसारीत केले होते. या स्टंटबाज युवकाचा शोध घेण्यासाठी स.पो.नि.शेलार व त्यांचे सहकारी सहा.फौ.धनवडे, हवालदार शिंगटे, माळी तसेच पो.ना. सोमनाथ शिंदे, वाघमारे यांनी प्रयत्न केले. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक संदिप भागवत, पो.नि.आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्टंटबाजी केल्याप्रकरणी ऋतूराज राजेंद्र करंजे याच्यावर पो. ना. रेळेकर यांनी फिर्याद देवून सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात विशेष मोहिम राबवून तीव्र कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कसलीही जीवघेणी स्टंटबाजी करु नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.