असत्य पसरविण्यासाठी इतिहासाची केविलवाणी तोडफोड

सातार्‍यातील समता परिषदेत अभ्यासकांचा सूर


सातारा – समता परिषदेत बोलताना प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे. त्यावेळी प्रा. डॉ. निरंजन फरांदे, प्रा. डॉ. अरुण गाडे, प्रा. डॉ. रामदास बोडरे, विजय मांडके, आनंदराव लादे.

 स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची आणि त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्याची दखल घेऊन 02 जानेवारी 1940 रोजी कराड नगरपालिकेने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले. ही ऐतिहासिक घटना असून त्यावेळचा सर्व इतिवृत्तान्त इतिहासात नोंदवलेला आहे. नगरपालिकेचे मानपत्र स्वीकारल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी तत्कालीन महार वस्तीला भेट दिली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी छोटेखानी भाषणही केले होते. यापेक्षा जास्त कराडमध्ये इतर कुठल्याही भेटीगाठी झाल्या नाहीत. परंतु या घटनेच्या 85 वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरुद्ध वर्तन करणार्‍या काही संघटनांना अचानक आलेला बंधुतेचा उमाळा खोटेपणाचा असून इतिहासाची तोडफोड करून असत्य प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही , असा सूर बुधवार दि. 14 जानेवारी रोजी सातारा येथे सर्व पुरोगामी-परिवर्तनवादी संघटना, संस्था, पक्ष व संयुक्त जयंती समारोह समिती यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या समता परिषदेत व्यक्त करण्यात आला.

सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या समता परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे होते. तर ज्येष्ठ पत्रकार व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. रामदास बोडरे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. अरुण गाडे, कराड येथील समता परिषदेचे आयोजक व समता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे, पुरोगामी चळवळीचे युवा अभ्यासक प्रा. निरंजन फरांदे, ओबीसींच्या प्रश्नासाठी काम करणारे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे आदी मान्यवरांनी यावेळी मांडणी केली.

प्रा. डॉ. बोडरे म्हणाले, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वांचे पालन न करणार्‍यांना खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले आहेत का, असा प्रश्न आहे. आपण डॉ. आंबेडकरांच्या विषमता निर्मूलनाचे विचाराने प्रेरित होऊन कृतीतून डॉ. आंबेडकरांचे अनुयायी असल्याचे दाखवून द्या.

प्रा. फरांदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार सबंध देशाने स्वीकारणे आवश्यक असताना समकाळात मात्र जातीयवाद, धर्मांधता , संविधानिक मूल्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशावेळी डॉ. आंबेडकरांचे विषयी पोकळ प्रेम दाखवण्यात कुठलाही अर्थ नाही.

विजय मांडके म्हणाले, काही विरोधी विचारांच्या संघटना अत्यंत खोटे आणि तकलादू संदर्भ घेऊन डॉ. आंबेडकरांविषयी दाखवत असलेले प्रेम वरवरचे, खोटे आणि आंबेडकरवादी विचारांचा अपमान करणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही चरित्रकाराने किंवा मूकनायक, जनता,समता, बहिष्कृत भारत इ. कुठल्याही मासिकात किंवा साप्ताहिकात ज्या घटनांचा उल्लेखच नाही , त्या घटना काही फुटकळ संदर्भ देऊन जनमानसात पसरवत आहेत. असत्य कधीही समाज मान्य करत नाही.

आनंदराव लादे म्हणाले, समतेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आजच्या दूषित वातावरणात समता परिषदेची आवश्यकता असून त्या भूमिकेतूनच आम्ही कराड येथे ऐतिहासिक समता परिषदेचे आयोजन केले. इतिहासाशी प्रतारणा करून कुठल्याही सबळ पुराव्यांचे स्पष्टीकरण न देता, अनैतिहासिक गोष्टी मांडण्याचा वैचारिक विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होता कामा नये.

प्राचार्य डॉ. अरुण गाडे म्हणाले, समतेची चळवळ बळकट करण्यासाठी समाजातील सर्व शोषितांना बरोबर घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत बहुजन समाज जागृत होत नाही तोपर्यंत शोषणव्यवस्थेचे प्राबल्य कमी करता येणार नाही. सामाजिक क्रांतीसाठी ऐक्याची भावना प्रचंड महत्त्वाची आहे.

प्राचार्य भिंगारदेवे म्हणाले, बहुजन समाजात जागृतीची आवश्यकता आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात देखील बहुजन समाज अपेक्षेप्रमाणे प्रगती करत नसून पुन्हा एकदा मोठी जनजागृती करावी लागेल. इतिहासाचे समाजाचे आकलन वाढविण्यासाठी समाजातील शिक्षकांनी पुढे येणे गरजेचे आहे.

समता परिषदेचा प्रारंभ ज्येष्ठ शाहीर श्रीरंग रणदिवे यांच्या आंबेडकरी गीत गायनाने करण्यात आला. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन शाहीर वैभव गायकवाड यांनी केले. आभार अ‍ॅड. आकाश कांबळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!