
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव मार्गावर सोमवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या रस्त्यावरील भैरोबा मंदिराशेजारील ऊसाच्या शेतात दगडाने ठेचून २५ वर्षीय युवतीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. युवतीच्या डोक्यातच दगड घातल्याने तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिर आहे. या मंदीरालगत ऊसाची शेती असून सोमवारी सकाळी परिसरातील काही लोक शेतीच्या कामानिमित्त निघाले असताना त्यांना रक्तबंबाळ अवस्थेतील युवतीचा मृतदेह दिसला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील, पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते, भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.
युवतीचा मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता. पोलिसांनी आसपास ओळख पटण्यासारखे काही मिळते का? याची पाहणी केली मात्र अशी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. युवतीचा खून नेमका का? व कशासाठी झाला? याच्या तपासासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.