
एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड आता थेट शाळेतच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आगार किंवा ई-सेवा केंद्रात जाण्याची गरज उरणार नाही.
स्थैर्य, सातारा, दि. ३० सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया थेट शाळेतच राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी आता एसटी आगार किंवा ई-सेवा केंद्रांचे फेरे मारावे लागणार नाहीत. एसटी महामंडळाचे अधिकृत प्रतिनिधी स्वतः शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
स्मार्ट कार्ड सरळ (SARAL) आयडीशी जोडणार
विद्यार्थ्यांच्या या NCMC स्मार्ट कार्डला त्यांचा ‘सरल’ (SARAL) आयडी जोडला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांना मिळणाऱ्या प्रवास सवलतींची नोंद डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील. विद्यार्थ्यांनी शाळेकडून मिळणाऱ्या सूचनांनुसारच ही नोंदणी पूर्ण करावी, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा केंद्राकडे आपली वैयक्तिक माहिती अथवा पैसे देऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
शुल्क आणि रिचार्जची सुविधा
एसटीच्या या NCMC स्मार्ट कार्ड योजनेत शालेय विद्यार्थ्यांसह इतर विविध सवलतधारक प्रवाशांचाही समावेश आहे. या नवीन NCMC कार्डची किंमत वस्तू व सेवा करासह (जीएसटी) १९९ रुपये ठेवण्यात आली आहे, तर जुने स्मार्ट कार्ड जमा करून नवीन कार्ड घेणाऱ्या प्रवाशांना १४९ रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. या कार्डमध्ये सुरुवातीला किमान १०० रुपयांचा रिचार्ज करता येईल, तर त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.



