
मुलांच्या आधार कार्डमधील अनिवार्य बायोमेट्रिक मोफत अपडेट करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असून त्यानंतर शुल्क आकारले जाणार आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ३० सप्टेंबर : ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार कार्डमधील अनिवार्य बायोमेट्रिक माहिती (Mandatory Biometric Update) मोफत अद्ययावत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिलेली मुदत संपत आहे. ३० सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख असून पालकांनी आपल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट न केल्यास त्यानंतर निर्धारित शुल्क मोजावे लागणार आहे.
वयाच्या ५ व्या आणि १५ व्या वर्षी अपडेट अनिवार्य
लहान मुलांचे आधार काढताना त्यांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन (आयरीस) घेतले जात नाहीत किंवा वयानुसार त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये बदल होतात. त्यामुळे मुल ५ वर्षांचे झाल्यानंतर पहिले आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसरे बायोमेट्रिक अपडेट करणे नियमानुसार अनिवार्य आहे. ५ ते १७ वर्षे वयोगटातील ज्या मुलांचे हे अपडेट प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने ही मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती.
शिक्षणासाठी आधार अपडेट आवश्यक
शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक असते. बायोमेट्रिक माहिती अद्ययावत नसल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी पाल्यांना सोबत घेऊन जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र मोफत अपडेट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



