
महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षेचे कोणतेही शुल्क न घेण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने जारी केले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. ३० सप्टेंबर : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वी (SSC) आणि १२वीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील घोषित २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे शुल्क माफ करण्यात आले आहे. आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.
‘आधी भरा, नंतर परत घ्या’ ही प्रक्रिया बंद
यापूर्वी दुष्काळ घोषित झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना सुरुवातीला बोर्ड परीक्षेचे शुल्क भरावे लागत असे आणि नंतर शासन स्तरावरून ही रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात परत केली जात असे. मात्र, या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने थेट अर्ज भरण्याच्या टप्प्यावरच शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून सर्व विभागीय मंडळांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
३२ लाख विद्यार्थी व पालकांना आर्थिक दिलासा
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती घोषित झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या काळात शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार ही सवलत लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांतील १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार असून ऐन परीक्षेच्या काळात पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे.



