हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहणार ‘उमेद’; धीरज अभंग यांचा विडणीत मोठा उपक्रम

विडणीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ देण्यासाठी धीरज अभंग यांनी उमेद फाउंडेशनची स्थापना केली आहे.

स्थैर्य, विडणी, दि. २८ सप्टेंबर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गावातील हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व पाठबळ देण्यासाठी विडणी येथे ‘उमेद फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक पाठबळ देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी मोठे व्यासपीठ

विडणी येथे कै. कृष्णराव केदारी अभंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सातवी वार्षिक सभा आणि उमेद फाउंडेशनचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव आणि संस्थेचे संस्थापक धीरज अभंग यांनी संस्थेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभारी देण्यासाठी उमेद चळवळ काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावाच्या विकासात युवकांचे योगदान

विडणी गावात सध्या दोन सुसज्ज अभ्यासिका असून, अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवत आहेत. या उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनीही भविष्यात फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, सरपंच सागर अभंग, उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष कुंदन शेंडे आणि पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पात्र विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!