
माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. फलटणमधील ३ गावे व ४ वाड्यांतील बाधित नागरिकांसाठी प्रशासनाने ३ टँकर सुरू केले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, सुमारे ६३ हजारांहून अधिक नागरिकांना टंचाईचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकूण ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यात टँकरचा आधार
फलटण तालुक्यालाही या पाणीटंचाईची झळ बसली आहे. तालुक्यातील ३ गावे आणि ४ वाड्यांमधील सुमारे २ हजार २२२ नागरिक या टंचाईमुळे बाधित झाले आहेत. या नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने फलटण तालुक्यासाठी ३ टँकर मंजूर केले असून, त्याद्वारे सध्या पाणीपुरवठा केला जात आहे.
माणमध्ये टंचाईची सर्वाधिक तीव्रता
जिल्ह्यात टंचाईची सर्वाधिक तीव्रता माण तालुक्यात दिसून येत आहे. माणमधील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजारांहून अधिक लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत. खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील नागरिकांना ४ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात ५३ हजार ८०७ पशुधनही बाधित झाले असून, टँकरच्या दररोज ८१ फेऱ्या पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.



