१०० व्या साहित्य संमेलनाची फलटणमध्ये नांदी; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यिकांना मोठी संधी

पुण्यात होणाऱ्या १०० व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये ६ ऑक्टोबर रोजी १० वे नांदी संमेलन आणि भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) फलटण शाखेतर्फे ६ ऑक्टोबर रोजी १० व्या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेणूताई चव्हाण हायस्कूलमध्ये आयोजन

साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आणि राज्यभरात साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी मसापतर्फे सध्या ‘नांदी संमेलनांची’ मालिका सुरू आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात मंगळवारी हे संमेलन पार पडणार आहे.

ग्रंथ प्रदर्शनासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

संमेलनानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी फलटण, माण आणि खंडाळा तालुक्यातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती ४ ऑक्टोबरपर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, खजिना हौदानजीक येथे पाठवाव्यात, असे आवाहन मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

साहित्यिकांचा होणार सन्मान

ग्रंथ प्रदर्शनात आपली ग्रंथसंपदा देणाऱ्या साहित्यिकांचा संमेलनामध्ये यथोचित स्वागत व सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे साहित्यिकांनी या उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा. अधिक माहितीसाठी ग्रंथ प्रदर्शन संयोजक महादेव गुंजवटे आणि शाखा कार्यवाह अमर शेंडे यांच्याशी संपर्क साधावा, असेही परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!