दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आले. मोदींच्या नेतृत्वात गेल्या आठ वर्षात देशात विकास कार्याची घोडदौड अविरत सुरू आहे.गेल्या आठ वर्षात पायाभूत सुविधा तसेच सोशल सेक्टर मधील योजनांवर सरकारने जवळपास ९०.९ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च केला,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले.सरकारी अहवालानूसार २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत केंद्र सरकारने विकासकार्यावर हा निधी खर्च केल्याचा दावा पाटील यांनी केला.
मोदी सरकारने पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच उत्पादक मालमत्ता निर्मितीसाठी २६ लाख कोटींचा निधी खर्च केला.या कालावधीत सरकारने अन्न, खतं, इंधनावरील अनुदानावर देखील २५ लाख कोटींचा निधी खर्च केला आहे. सोबतच सरकारने आरोग्य, शिक्षण आणि गरजुंना माफक दरात घरे देण्यासाठीच्या योजनेवर १० लाख कोटींचा निधी खर्च केला. सरकारने नि:शुल्करेशन, महिलांना रोख मदत, पीएम किसान तसेच इतर अनुदान वितरणाच्या माध्यमातून २ लाख २५ हजार कोटींचा निधी खर्च केला आहे,असे देखील हेमंत पाटील म्हणाले.
गेल्या आठ वर्षात अनेक महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहे. शेतकरी, सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून हे निर्णय घेण्यात आल्याने देशवासियांना दिलासा देण्याचे कार्य केंद्र सरकार करीत आहेत.मोदी सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले, जम्मू-काश्मिर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले.नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला.तिहेरी तलाकवर कायदेशीर बंदी घातली तसेच संरक्षण प्रमुख (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) या नवीन पदाची निर्मिती केली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्राने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते.कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतक-यांना खात्यात थेट पैसे जमा करणे. गरीब कुटुंबाना मोफत गॅससिलेंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक,विधवा व दिव्यांगाना थेट आर्थीक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले. शेतकरी, लघुउद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देवून अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत,असे प्रतिपादन हेमंत पाटील यांनी केले.