
दैनिक स्थैर्य । 9 मे 2025। सातारा । येथील यादोगोपाळ पेठ सव्र्व्हे नंबर 344 येथील तब्बल 80 वर्षापूर्वीची जुनी लक्ष्मी निवास इमारत काल सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान अचानक कोसळली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने इमारत रिकामीच असल्याने जीवितहानी झाली नाही. या इमारतीलगत असलेल्या दुसर्या इमारतीच्या विकसन प्रक्रिया दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून सातारा पालिकेच्यावतीने तात्काळ इमारत उतरवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहर विकास विभागाचे पथक तेथे घटनास्थळी दाखल झाले होते. सातारा येथील यादोगोपाळ पेठेत कोसळलेली जुनी लक्ष्मी निवास इमारत. सातारा पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. यादोगोपाळ येथील पेठेत जुन्या चित्रा टॉकीज परिसरातील लक्ष्मी निवास ही इमारत सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला. यामुळे नागरिकांची एकच पळापळ झाली.
समर्थ मंदिर परिसराकडे जाणार्या रस्त्यावर पोलीस व नागरिकांची गर्दी झाली होती. सुदैवाने ही इमारत मोकळीच असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सातारा पालिकेने यापूर्वीच ही 80 वर्षांपूर्वीची इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती.
लाकडी कडेपाट आणि मातीचे बांधकाम असलेल्या या दुमजली इमारतीचा निवासी वापर यापूर्वी संपुष्टात आला होता. इमारतीलगत दुसर्या एका इमारतीचे खोदकाम सुरू होते. पायासाठी येथे जमीन आठ ते दहा फूट जमीन खणण्यात आली होती. इमारत कोसळतान आवाज झाल्याने प्रत्यक्षदर्शी इतरत्र धावले. यावेळी नव्या इमारतीसाठी येथे आठ कामगार काम करत होते. मात्र, मातीच्या भरावाने ट्रॅक्टर ट्रॉली भरण्यासाठी रस्त्यावर आल्याने आणि त्याचवेळी इमारत कोसळली म्हणून सुदैवाने कामगार बचावले.
या इमारतीलगतच्या दुसर्या निवासी इमारतीचे फारसे नुकसान झाले नाही. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केले. तर सातारा पालिकेचे शहर विकास विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीचा पडलेला भाग तात्काळ सुरक्षितस्थळी हटवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे.