दैनिक स्थैर्य | दि. 11 जुन 2024 | फलटण | फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र होती. तालुक्यामध्ये एकूण 42 गावांना 33 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली असून आता 42 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाच्या अंदाजाने आगामी काळामध्ये ही सुद्धा टँकर संख्या कमी होईल; अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; दि. 31 मे पर्यंत फलटण तालुक्यात 42 गावांना 33 टँकरद्वारे दररोज 86 खेपांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसातील पावसानंतर दि. 11 जुन अखेर 34 गावांना 25 टँकरच्या माध्यमातून 61 खेपांच्या द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. म्हणजेच एकूण 8 गावांमधील 8 टँकर कमी झाले असून एकूण 25 टँकरच्या 25 खेपा कमी झाल्या आहेत.