८ लाखांचे पडदे, व्हिएतनामचे मार्बल; अरविंद केजरीवालांच्या गृहसजावटीवर ४५ कोटींचा खर्च!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । मुंबई । गेल्या काही काळापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत. अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सडेतोड प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवरून तीव्र नाराजीही अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. मात्र, यातच आता त्यांच्याच बंगल्याच्या सजावटीसाठी ४५ कोटींचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८ लाख रुपयांचे पडदे लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर, मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. सदर मार्बल व्हिएतनामवरून आणल्याचा दावा केला जात आहे. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. यावरून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा खरा प्रामाणिकपणा आता उघड झाल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे. कोरोना साथीच्या काळात बंगल्याच्या सजावटीवर एवढा मोठा निधी का खर्च करण्यात आला, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. भाजपकडून आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे आणि असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत. १ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आले आहेत, तर ४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आले आहे. घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती. यामध्ये लायटिंग काम आणि स्वयंचलित फायर अलार्म सिस्टमसह आरसीसी-फ्रेम केलेल्या संरचनेवरच्या कामाचा समावेश होता. दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये मॉड्यूलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री इत्यादी बनवण्यासाठी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दस्तऐवजांमध्ये असलेल्या माहितीनुसार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग कामांव्यतिरिक्त विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लायटिंग फिक्स्चर (२,४४६ फिक्स्चर), ऊर्जा कार्यक्षम पंखे (८० पंखे) आणि डंबवेटर लिफ्ट (जेवण पोहोचवण्यासाठी) एकूण खर्चाचा भाग आहे.


Back to top button
Don`t copy text!