स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: ७३ व्या लष्करी दिनाच्या निमित्ताने बुधवारी सैनिकांनी फुल ड्रेस सराव केला. त्यात ब्रिज लेयर टँक (बीएलटी-७२) व मल्टी बॅरल रॉकेट लाँचर पिनाका २४४ सह अनेक शस्त्रास्त्रांचे दर्शन घडवणारे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले. सैन्य सेवा कोरच्या मोटारसायकल टीम टोर्नाडोच्या जवानांनीदेखील शौर्याचे दर्शन घडवले. यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी गलवानमध्ये शहीद तीन जवानांच्या वीरपत्नींचा पुरस्काराने गौरवले. दिल्लीच्या छावणी परेड मैदानावर होणारे संचलन गलवानमधील शहिदांच्या स्मरणार्थ केले जाणार आहे. परेडची सलामी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे स्वीकारतील. चीफ ऑफ डिफेन्सशिवाय हवाई दल, नाैदलप्रमुखांचीदेखील उपस्थिती असेल.
देशात का साजरा केला जातो लष्करी दिन?
१५ जानेवारी १९४९ रोजी फील्ड मार्शल कोदानदेरा एम करिअप्पा यांनी भारताचे कमांडर इन चीफ म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी अंतिम ब्रिटिश कमांडर इन चीफ फ्रान्सिस बूचर यांच्याकडून पद स्वीकारले होते. सैन्य या दिवसाचे स्मरण करून हा दिन साजरा करते.
शक्तिदर्शनाचे आकर्षण
लष्करी पथसंचलनात बीएमपी-२ ची वज्र-टी, तोफा, धनुष गन, टी-९० रणगाडेही सामील होतील. मुख्य आकर्षण म्हणजे लष्करी वस्तूंच्या प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे. त्यात स्वदेशी शस्त्रास्त्रे पाहायला मिळतील. त्यात युद्धसामग्रीसह रडार, यूएव्ही, क्वाड कॉप्टर, जॅमर्स, महिला व पुरुषांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट शक्ती, बुलेटप्रूफ हेल्मेट अभेद्य, अँटी माइन बूट पद्मकवचचा समावेश असेल.